सूचना करूनही बदल नाही, रत्नागिरी जिल्हा शल्य चिकित्सकांवर खातेनिहाय कारवाई; पालकमंत्र्यांनी दिली माहिती
By मनोज मुळ्ये | Published: June 21, 2023 05:43 PM2023-06-21T17:43:54+5:302023-06-21T17:44:15+5:30
सूचना करूनही कोणताही बदल झाला नसल्याने कारवाई
रत्नागिरी : प्रसुतीनंतर आई एकीकडे आणि तिचे बाळ दुसरीकडे अशी स्थिती असता कामा नये, अशी सूचना दोन महिन्यांपूर्वी करूनही या स्थितीत कोणताही बदल झाला नसल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्यावर खातेनिहाय कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
बुधवारी रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या मंत्री सामंत यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे आणि गैरव्यवस्थेबाबत ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारीच जिल्हाधिकारी यांची भेट घेतली होती. दरम्यान, बुधवारी पालकमंत्री उदय सामंत यांनी रुग्णालयातील व्यवस्थेबाबत आढावा घेतला.
प्रसुती झाल्यानंतर आई आणि बाळ एकाच ठिकाणी असायला हवेत. ते दोन ठिकाणी असू नयेत, अशी सूचना आपण स्वत: डॉ. फुले यांना केली होती. मात्र दोन महिन्यात त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे त्यांच्यावर खातेनिहाय कारवाई करण्याचा निर्णय पालकमंत्री म्हणून मी घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.