चाचणी अहवालात अचूकता गरजेची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:33 AM2021-05-06T04:33:40+5:302021-05-06T04:33:40+5:30
कोरोनाबाधित नसतानाही एका महिलेला बाधित ठरविण्यात आले. पुढील चार ते पाच तास निरोगी असताना तिला कोरोना रुग्णांसमवेत राहावे लागले. ...
कोरोनाबाधित नसतानाही एका महिलेला बाधित ठरविण्यात आले. पुढील चार ते पाच तास निरोगी असताना तिला कोरोना रुग्णांसमवेत राहावे लागले. यामुळे संबंधित रुग्णाला व कुटुंबियांना नाहक त्रास सहन करावा लागला. एवढ्यावरच तो संपला नाही, तर काही तास कोरोना रुग्णालयात राहिल्याने संबंधित रुग्णाची पुन्हा तपासणी करावी लागणार आहे. त्यामुळे पुढील वैद्यकीय अहवाल येईपर्यंत रुग्णाच्या डोक्यावर टांगती तलवार राहणार आहे. वैद्यकीय अधिकारी मात्र याबाबत चाैकशी करणार असल्याचे सांगत आहेत. दिवसभरात हजारो तपासण्या कराव्या लागत असल्याने अशा चुका होऊ शकतात, अशी वक्तव्ये काही कर्मचारी करीत असतील तर हे मात्र हास्यास्पद आहे.
काेरोना होऊन बरे होणाऱ्यांची संख्या निश्चितच चांगली आहे. कोरोनामुळे निधन होणारे रुग्ण असले तरी धक्का पचवू न शकता आल्याने मृत्यू होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे वैद्यकीय अहवाल देताना काळजी घेणे आवश्यक आहे. एखाद्या रुग्णाच्या जिवाशी चुकीच्या अहवालामुळे खेळ होऊ शकतो. आरोग्य यंत्रणेवरील कामाच्या ताणाची सर्वसामान्य जनतेला कल्पना आहे. मात्र, अशा चुकाही अक्षम्य आहेत. कित्येक रुग्ण कोरोना पाॅझिटिव्ह अहवाल आल्याचा धक्का सहन न झाल्याने मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे डोळ्यात तेल घालूनच रुग्णांचे चाचणी अहवाल देणे गरजेचे आहे.
शासनाकडून लाॅकडाऊन घोषित केले असले तरी बेफिकिरीने वावरणाऱ्यांची संख्या अद्यापही कमी झालेली नाही. महामार्गावरून येताना ई-पासची आवश्यकता आहे. मात्र, रेल्वेने येणाऱ्यांसाठी पासची सक्ती नाही. वैद्यकीय चाचणी प्रमाणपत्र एखाद्याने आणले असेल तर त्याची तपासणी होत नाही. होम क्वारंटाइनचा शिक्का मात्र मारला जातो. काही लोकांना चाैदा दिवस गृहविलगीकरणात राहणे शक्य नाही. त्यामुळे आलेली मंडळी होम क्वारंटाइन पूर्ण होईपर्यंत निघूनही जात आहे. यामुळे कोरोना संसर्गाला वेळ लागत नाही किंबहुना वाढलेल्या संख्येला हेही कारण पुरेसे आहे. गतवर्षी लाॅकडाऊन काळात कोरोना रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविणे प्रशासनाला शक्य झाले होते. यावर्षी कोरोना तपासणी केंद्र, उपचार केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. मात्र, कारणाशिवाय बाहेर पडून बेफिकिरीने वागणाऱ्यांमुळेच जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढत आहे. यावर उचित कारवाई होणे गरजेचे आहे.