प्राथमिक शिक्षक पतपेढी संचालकांवर मनमानी केल्याचा आरोप
By admin | Published: July 15, 2017 02:47 PM2017-07-15T14:47:03+5:302017-07-15T14:47:03+5:30
कारभाराची चौकशी करा : सुभाष कोकरे यांचे निवेदन
आॅनलाईन लोकमत
रत्नागिरी , दि. १५ :प्राथमिक शिक्षक पतपेढीत तीन महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेल्या संचालक मंडळाने मनमानी सुरु केली असून, कर्मचाऱ्यांच्या नियमबाह्य बदल्या करणे, दुरुस्तीच्या निविदा काढणे, संगणकीय कर्ज पासबुके न देणे, व्यवहाराची एसएमएस सुविधा न देणे अशा अनेक प्रकारांमुळे या संचालक मंडळाचा कारभार वादग्रस्त ठरला आहे. त्यांच्या कारभाराची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी सभासद सुभाष कोकरे यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
प्राथमिक शिक्षक पतपेढीत सत्ताबदल होऊन तीन महिन्यांपूर्वी नवीन संचालक मंडळ सत्तारूढ झाले. मात्र, या संचालक मंडळानेही सभासदांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना तिलांजली दिल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. आपल्या मर्जीतल्या कर्मचाऱ्यांची एक वर्षाच्या आतच सोयीच्या ठिकाणी बदली, तर अन्य कर्मचाऱ्यांची मात्र गैरसोयीच्या ठिकाणी दूर बदली करणे, दोन वर्षांपूर्वी रुजू झालेल्या चिटणीसाचा राजीनामा घेणे असा मनमानी कारभार संचालक मंडळाकडून सुरु असून, या सर्व बाबींची चौकशी करावी, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.