आरोपी तुपाशी, विद्यार्थी उपाशी
By admin | Published: July 15, 2014 11:40 PM2014-07-15T23:40:59+5:302014-07-15T23:45:27+5:30
पोषण आहार भ्रष्टाचार : साहित्य येऊनही कायदेशीर कारवाईमुळे पडूनच
आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवईच्या भाईशा घोसाळकर हायस्कूलच्या पोषण आहारात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे ग्रामस्थांनी उघड केल्यानंतर मुख्याध्यापक अशोक साळुंखे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, ते अजूनही मोकळेच असून, त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. या प्रकारात पोषण आहाराच्या खोलीला कुलूप ठोकण्यात आले असल्याने विद्यार्थी त्यापासून वंचित राहत आहेत.
पोषण आहारात भ्रष्टाचार होत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात येताच कडवई येथील ग्रामस्थ पोषण आहार व्यवस्थेवर लक्ष ठेवून होते. शैक्षणिक वर्ष संपले असताना १५ एप्रिल २०१४ रोजी भाईशा घोसाळकर हायस्कूलच्या पोषण आहाराच्या खोलीत १३८ पोती तांदूळ, २४० लीटर तेल, डाळी व इतर साहित्य असा मोठा संशयास्पद साठा ग्रामस्थांना आढळून आला होता. हा साठा संस्थाध्यक्ष चंद्रकांत यलगुडकर, मुख्याध्यापक अशोक साळुंखे, शिक्षक - पालक संघाचे उपाध्यक्ष मिलिंद शिंदे यांच्यासमक्ष ग्रामस्थांनी हा साठा योग्य निर्णय लागेपर्यंत सील केला होता.
मात्र, ६ जून २०१४ रोजी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि ग्रामस्थांनी पाहाणी केली असता हे सील तोडल्याचे निदर्शनास आले. हे सील संस्थाध्यक्ष यलगुडकर, मुख्याध्यापक साळुंखे आणि मिलिंद शिंदे यांनी पोलीसपाटील रमेश तुळसणकर यांच्या समक्ष तोडल्याचे समोर आले. या सर्व प्रकाराची कल्पना मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार कालमपाटील यांना दिली असता त्यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले.
शिक्षण विभागाने केलेल्या चौकशीत सर्व माल लंपास झाल्याचे उघड झाले. यात मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचे सिद्ध झाल्याने ३ जुलै रोजी संगमेश्वर पोलीस स्थानकात मुख्याध्यापकांविरुद्ध तक्रार दाखल होऊन गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यापूर्वीच मुख्याध्यापक रजेवर गेल्याने त्यांना अटक होऊ शकली नाही. या सर्व प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक रविराज फडणीस करत आहेत. संगमेश्वर पोलिसांचे एक पथक मुख्याध्यापकांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली या मूळ गावी जाऊन आले असल्याचे फडणीस यांनी सांगितले.
संबंधित मुख्याध्यापक हा अटकपूर्व जामीन घेण्याच्या प्रयत्नात असल्याचे बोलले जात आहे. या सर्व घडामोडीत भाईशा घोसाळकर हायस्कूलचे विद्यार्थी मात्र पोषण आहारापासून वंचित राहिले आहेत. पोषण आहार खोलीला सील असल्याने ७ जुलै २०१४ रोजी नवीन शैक्षणिक वर्षाच्या पोषण आहाराचे साहित्य शाळेत आले असून, ते या कायदेशीर कारवाईमुळे तसेच पडून आहे. (वार्ताहर)