नाट्य कलाकार घडविण्यासाठी अभिनयाचे धडे

By admin | Published: September 7, 2014 10:51 PM2014-09-07T22:51:55+5:302014-09-07T23:19:39+5:30

कलाकारांना चांगले प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास

Acting lessons to make theatrical artist | नाट्य कलाकार घडविण्यासाठी अभिनयाचे धडे

नाट्य कलाकार घडविण्यासाठी अभिनयाचे धडे

Next

चिपळूण : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई व स्थानिक नाट्यकर्मींच्या सहकार्याने चिपळूणमध्ये दसऱ्यापासून कायमस्वरुपी अभिनय (अ‍ॅक्टिंग) प्रशिक्षण वर्ग चालू करण्याचा मानस असल्याची माहिती फिल्म रायटर असोसिएशन, मुंबईचे सदस्य व येथील स्थानिक नाट्यकर्मी सी. एम. चितळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्यासारख्या कलाकारांनी चित्रपट व नाट्य सृष्टी एकेकाळी गाजवली आहे. चिपळूणात सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक परंपरा आजही जोपासली जात आहे. टी. व्ही.च्या जमान्यात नाट्य क्षेत्राचा हळूहळू विसर पडू लागला आहे. नाट्यकला ही जिवंत राहिली पाहिजे. या अनुषंगाने ज्येष्ठ रंगकर्मी एकत्र आले आहेत. हे प्रशिक्षणवर्ग महिन्यातून प्रत्येक शनिवार, रविवारी घेतले जाते. यामध्ये १० ते १५ बालगट, १५ ते २२, ३० ते ४० व ४० ते ४५ या वयोगटात इच्छुक असणाऱ्या कलाकारांना अभिनयाचे धडे दिले जाणार आहेत. ५ गटातून प्रत्येकी १० इच्छुक कलाकारांची निवड केली जाणार आहे. ५० जणांच्या गटातून २५ पुरुष व २५ महिला अशा प्रकारे एका ग्रुपला ४ महिने नाट्यविषयक अभिनय, दिग्दर्शन, नेपथ्य, संगीत, नाट्यलेखन अशा विविध विषयातून मार्गदर्शन देण्यात येणार आहे. वर्षभरात ३ ग्रुप तयार केले जातील, असेही चितळे यांनी सांगितले. निवड झालेल्या कलाकारांना स्थानिक नाट्यकर्मी शनिवारी मार्गदर्शन करतील तर रविवारी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई यांच्यातर्फे प्रथितयश नाट्य कलाकार मार्गदर्शन करणार आहेत. एकंदरीत रंगभूमीला चांगले दिवस यावेत, या दृष्टीने संस्थेचा हा प्रयत्न आहे. शब्दफेक, स्ट्रेज डेअरिंग अभिनयाची आवड असलेल्या कलाकारांना नाट्य क्षेत्रात काम करण्याची संधी दिली जाणार आहे. यासाठी सुदृढ शरीरयष्टी, चांगला चेहरा असणे आवश्यक आहे. इच्छुक कलाकारांनी पूर्ण फोटो अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. तयार होणाऱ्या कलाकारांना नाटक तसेच लघुपटात व स्थानिक पातळीवर तयार करण्यात येणाऱ्या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. इच्छुक कलाकारांनी प्रवेश अर्जासाठी गुरुप्रसाद इलेक्ट्रीकल, चिंचनाका येथे संपर्क साधावा, असे आवाहनही चितळे यांनी केले आहे. चिपळूण येथे चितळे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. या प्रशिक्षणाला चांगला प्रतिसाद मिळेल व येथील कलाकारांना चांगले प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.(वार्ताहर)

Web Title: Acting lessons to make theatrical artist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.