चिपळुणात ५ दुकानदार, २८ दुचाकीस्वारांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:29 AM2021-04-13T04:29:57+5:302021-04-13T04:29:57+5:30
चिपळूण : सलग दोन दिवस झालेल्या वीकेंड लॉकडाऊनमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पाच दुकानदारांवर आणि २८ दुचाकीस्वारांवर येथील पोलिसांनी दंडात्मक ...
चिपळूण : सलग दोन दिवस झालेल्या वीकेंड लॉकडाऊनमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पाच दुकानदारांवर आणि २८ दुचाकीस्वारांवर येथील पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.
वीकेंड लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर चिपळूण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. त्याला येथील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण बाजारपेठ बंद होती. व्यापाऱ्यांनीही कडकडीत बंद पाळल्याने येथील बाजारपेठ सुनीसुनी झाली होती. खासगी वाहतूकही बंद असल्याने महामार्गासह शहरातील रस्ते निर्मनुष्य झाले होते. यानिमित्ताने शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी तसेच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
शहरातील पाग, देसाई बाजार, उक्ताड, गोवळकोट, फरशी तिठा, बाजारपूल, चिंचनाका, बहाद्दूरशेख नाका आदी ठिकाणी तंबू उभारून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्या - त्या ठिकाणी वाहनांची कसून चौकशी केली जात होती. अनेकजण बचावासाठी जीवनावश्यक वस्तू व औषध खरेदीसाठी घराबाहेर पडल्याचे सांगत होते. तरीही येथील पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २८ जणांवर प्रत्येकी ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली. तसेच परवानगी नसतानाही काही व्यापाऱ्यांनी दुकाने उघडल्याने त्यांच्यावरही कारवाई केली आहे.