भारजा नदीपात्रातील वाळु उपशाविरोधात धडक कारवाई, जमीन मालकावरही कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 10:59 AM2019-03-04T10:59:50+5:302019-03-04T11:01:35+5:30
भारजा नदीपात्रात आंबवली या ठिकाणी सुरु असलेल्या बेकायदेशीर वाळु उपशाविरोधात महसूल व पोलीस पथकाने संयुक्तपणे केलेल्या धडक करावाईत बोट, पंप, उपसा केलेली वाळु, ताब्यात घेताना २ लाख ८७ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. प्लॉटचे मालकावर कारवाई करताना उपसा करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले आहे.
मंडणगड : भारजा नदीपात्रात आंबवली या ठिकाणी सुरु असलेल्या बेकायदेशीर वाळु उपशाविरोधात महसूल व पोलीस पथकाने संयुक्तपणे केलेल्या धडक करावाईत बोट, पंप, उपसा केलेली वाळु, ताब्यात घेताना २ लाख ८७ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. प्लॉटचे मालकावर कारवाई करताना उपसा करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले आहे.
तहसिलदार प्रशांत पानेवकर यांच्या नेतृत्वाखाली महसुल व पोलीस पथकाने २ मार्च रोजी अनधिकृत वाळु उपशाविरोधात आंबवली येथे भारजा नदीपात्रात सकाळी ६ वाजता केलेल्या धडक कारवाईत संक्शन पंप, वाळु वाहतूक करणारी बोट व प्लॉटवरील वाळु ताब्यात घेताना २ लाख ८७ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
कारवाई संदर्भात तहसिल कार्यालयातून मिळालेल्या माहीतीनुसार, भारजा नदीचे पात्रात आंबवली या ठिकाणी अंकुश सदानंद रटाटे यांच्या नदीलगत असलेल्या प्लॉटवर महसूल विभागाने धडक कारवाई केली यावेळी संक्शन पंप व बोटीच्या मदतीने नदीपात्रात वाळूउपसा करणारे अब्दुल रेहमान उमर मुकादम, इम्तीयाज हसन हळदे राहणार मांदीवली या दोघांना ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.
याचबरोबर २ लाख ८७ हजार रुपये किंमतीचा संक्शन पंप, वाळू वाहतूक करणारी बोट, व वाळु ताब्यात घेण्यात आली या कारवाईत बाणकोट सागरी पोलीस स्थानकाचे पोलीस निरिक्षक सुभाषचंद्र्र मारकड, पोलीस हवालदार संदीप महाडीक, नारायण आळे, महेश लिंगायत, गजानन खामकर, महसुल विभागाचे प्रविण मोरे, तलाठी शिगवण यांनीही भाग घेतला.
मंडणगड तालुक्यातील गोड्या पाण्याच्या नदीपात्रांकडे विशेषत: भारजा नदीकडे वाळूमाफियांची नजर वळली असल्याने महसूल विभागाने भारजा नदीपात्रात आंबवली या ठिकाणी अनधिकृत वाळू उपशाविरोधात केलेल्या धडक करावाईमुळे तालुक्यात सुरु असलेल्या सर्व प्रकारचा अनधिकृत व बेकायदेशीर वाळूउपसा व वाहतुकीविरोधात प्रशासनाची करडी नजर असल्याची भूमिका महसूल विभागाने या कारवाईनंतर स्पष्ट केली आहे.
गाडगीळ समितीच्या अहवलातील तरतुदीप्रमाणे खनिकर्म जंगलतोड व खारीफुटीच्या रक्षणासाठी त्यातील तरतुदीप्रमाणे कारवाईचे संकेत मिळत आहेत. यासाठी तालुक्यातील उमरोली, फाटा, देव्हारे फाटा इत्यादी मुख्य नाक्याचे ठिकाणी तपासणी करण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहीती मिळाली आहे.
दरम्यान महुसल विभागाने केलेल्या कारवाईनंतर वाळूमाफियांचे धाबे चांगलेच दणाणले असून सावित्रीनदी पात्रात वेसवी, शिपोळे, उमरोली, पंदेरी या ठिकाणी चोराटी मागार्ने चालणारा वाळू उपसा रोखण्यासाठी उपायांची आवश्यकता आहे.
संक्शनचा वाळूउपसा सुरु करण्याची शक्यता
वाळूमाफिया भारजा नदीचे रुंद व मोठ्या असलेल्या नदीपात्रात त्यांच्या फायद्याचे व सोयीचे लाटवण तिडे या ठिकांणासह अनेक ठिकाणी संक्शनचा वाळूउपसा सुरु करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
खरे सुत्रधार अजूनही दूरच
महसूल विभागाच्या धडक कारवाईनंतरही येथील तहसिल कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर चोवीस तास नजर ठेवणाऱ्या वाळू माफियांचे टोळके कारवाईचे परिघांपासून दुर असल्याचे बोलले जात आहे. अद्याप कारवाईची झळ या टोळक्याला लागलेली नसल्याने त्यांच्या कुरापती वाढण्याची शक्यताही बोलली जात आहे.