चिपळुणात हेल्मेट सक्ती अंतर्गत २००हून अधिक जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:32 AM2021-05-10T04:32:16+5:302021-05-10T04:32:16+5:30
चिपळूण : नगर परिषद हद्दीत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी रत्नागिरीसह चिपळुणातही हेल्मेट सक्तीचा आदेश दिला आहे. त्यानुसार रविवारी चिपळूण ...
चिपळूण : नगर परिषद हद्दीत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी रत्नागिरीसह चिपळुणातही हेल्मेट सक्तीचा आदेश दिला आहे. त्यानुसार रविवारी चिपळूण शहरातील चौकाचौकात २००हून अधिक जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
काही वर्षांपूर्वी चिपळूण शहरात हेल्मेट सक्ती करण्यात आली होती. मात्र, काही दिवसातच त्याची अंमलबजावणी थांबली होती. त्यानंतर येथे हेल्मेट सक्तीची कारवाई केली जात नव्हती. केवळ महामार्गावर त्याबाबतची कारवाई केली जात होती. त्यामुळे शहरातील नागरिक हेल्मेटचा वापर फार करत नव्हते. मात्र, आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिश्रा यांनी रत्नागिरी बरोबरच चिपळूण येथेही हेल्मेट सक्ती केली आहे. याबाबतचे आदेश नुकतेच एका परिपत्रकाद्वारे दिले आहेत. त्यानुसार शनिवारीच पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी शहरात गाडी फिरवून स्पीकरद्वारे हेल्मेट सक्तीविषयी आवाहन केले होते.
रविवारी सकाळपासूनच या कारवाईला सुरुवात करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी व पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. शहरातील भेंडी नाका, गांधी चौक, चिंच नाका, रंगोबा साबळे मार्ग, बहाद्दूरशेख नाका, पाग देसाई बाजार आदी ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ज्यांच्याकडे हेल्मेट नाही, त्यांच्याकडून ५०० रुपये दंड वसूल केला जात होता. तसेच विनाकारण फिरणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली.
-------------------------------
चिपळुणात हेल्मेट एक हजार रूपये
जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी हेल्मेट सक्तीचे आदेश दिल्याने शहर व परिसरात हेल्मेटचे दर अचानक वाढले आहेत. पूर्वी ४०० ते ५०० रुपये दराने विक्री केले जाणारे हेल्मेट अचानक एक हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक दराने विक्री केले जात आहे. आधीच कोरोना परिस्थितीत लॉकडाऊन सुरु असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली असताना, आता कामानिमित्त घराबाहेर पडावं तर हेल्मेटसाठी मोठी रक्कम मोजावी लागते अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत आहे.