कशेडी येथे आरामबसवर कारवाई; एक प्रवासी पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:24 AM2021-06-04T04:24:25+5:302021-06-04T04:24:25+5:30
खेड : रत्नागिरी जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या कशेडी घाटात गुरूवारी सकाळी ६ वाजता रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या एका खासगी ...
खेड : रत्नागिरी जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या कशेडी घाटात गुरूवारी सकाळी ६ वाजता रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या एका खासगी बसवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या बसमधून प्रवास करणाऱ्या २९ जणांची आरोग्य विभागाच्या पथकाने तत्काळ अँटिजन चाचणी केली़ असता, त्यामध्ये एक प्रवासी कोरोनाबाधित आढळला आहे.
जिल्ह्यात गुरुवारपासून कडक लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या असून, केवळ अत्यावश्यक कारणांसाठी परवानगी घेऊन जिल्ह्यात येणाऱ्यांनाच दिनांक २ रोजीपासून प्रवेश देण्यात येत आहे.
मात्र, गुरुवारी सकाळी ६ वाजता कशेडी घाटात पोलिसांची नाकाबंदी सुरू असताना, खासगी आरामबस (एमएच ०३, सीव्ही ३१५०) थांबवली असता, चालकाकडे व प्रवाशांकडे प्रवासाची काेणतीही परवानगी नव्हती़. पोलिसांनी चालकासह प्रवाशांची आरोग्य विभागाच्या फिरत्या पथकाद्वारे महाड नाका येथील एस़. टी़.च्या मैदानात अँटिजन चाचणी केली. यावेळी बसमधून प्रवास करणारा एक प्रवासी कोरोनाबाधित आढळला. या प्रवाशाला तातडीने शिवतेज संस्थेच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. हा प्रवासी संगमेश्वर तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. बसमधून प्रवास करणाऱ्या अन्य २८ जणांची तालुका प्रशासनाने राज्य परिवहन महामंडळाच्या बसने पुढील प्रवासाची व्यवस्था केली आहे. या सर्व प्रवाशांची दिशाभूल करून त्यांना जिल्ह्याच्या हद्दीत घेऊन येणाऱ्या बसचालक व मालक यांच्यावर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया खेड पोलीस स्थानकात सुरू करण्यात आली आहे.
-------------------
फिरते पथक वाहनाविनाच
खेडमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांची व जिल्ह्यात विनापरवानगी प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची अँटिजन चाचणी करण्याची व्यवस्था तालुका आरोग्य विभागाने केली आहे. मात्र, दि. ३ रोजी महाड नाका येथील एस. टी़. मैदानात चक्क खुल्या जागेत आरोग्य विभागाचे कर्मचारी अँटिजन चाचणी करत हाेते. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने या पथकाला किमान एक वाहन उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
---------------------------
मुंबई - गोवा महामार्गावर कशेडी येथे पोलिसांच्या तपासणी दरम्यान विनापरवानगी जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या आरामबसवर कारवाई करण्यात आली.
खेड येथील एस. टी़. मैदानात खुल्या जागेत प्रवाशांची आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अँटिजन चाचणी केली.