रत्नागिरीत चाळीस नौकांवर कारवाई
By Admin | Published: June 21, 2016 10:33 PM2016-06-21T22:33:10+5:302016-06-22T00:08:04+5:30
बंदी आदेशाचा भंग : वरवडेतील प्रकार; नौका मालकांवर खटले
रत्नागिरी : ‘पावसाळी मासेमारी बंदी आदेश’ मोडून समुद्रात मासेमारीला गेलेल्या वरवडे येथील ४० पारंपरिक यांत्रिक नौका मंगळवारी मत्स्यव्यवसाय खात्याने पकडल्या. या नौकांवरील १६ हजार रुपये किमतीचे मासे जप्त करण्यात आले. पकडलेल्या सर्व नौकांच्या मालकांविरोधात तहसीलदारांकडे खटले दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
सागरी व खाड्यांमधील मासेमारीवर पावसाळ्याच्या काळात शासनाने बंदी घातली आहे. १ जून २०१६ पासून ही बंदी सुरू झाली असून, ३१ जुलै रोजी बंदीकाळ संपुष्टात येणार आहे. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो. त्यामुळे मासेमारीला जाणे मच्छिमारांच्या जीविताला धोका निर्माण करणारे आहे. तसेच पावसाळ्याच्या कालावधीत मासे किनाऱ्यावरील पाण्यात प्रजननासाठी येतात. अशावेळी मासेमारी केल्यास नवीन मत्स्यजीव मारले जातात व त्याचा पुढील मत्स्य उत्पादनावर विपरित परिणाम होत असल्याचे याआधी निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या कालावधीत मच्छिमारीवर कायद्याने बंदी घालण्यात आली आहे.
बंदी असतानाही जिल्ह्यात काही ठिकाणी अद्यापही छुप्या पद्धतीने यांत्रिक नौकांद्वारे मच्छिमारी केली जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. रत्नागिरी तालुक्यातही रत्नागिरीसह वरवडे, जयगड, कासारवेली या भागातील काही मच्छिमार दोन सिलिंडरची यंत्रे असलेल्या पारंपरिक नौकांद्वारे मच्छिमारी करून बंदी मोडत असल्याच्या तक्रारी काही मच्छिमारांकडूनच मत्स्यव्यवसाय खात्याकडे करण्यात आल्या आहेत. राजिवडा येथील मच्छिमारांनीही ‘लोकमत आपल्या दारी’ कार्यक्रमाच्यावेळी मासेमारी बंदी मोडणाऱ्यांविरोधात तक्रार केली होती. त्यानंतर मत्स्यव्यवसाय खात्यानेही अशा बंदी मोडणाऱ्यांविरोधात मोहीम राबविण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार ही पहिलीच कारवाई वरवडे येथे करण्यात आली आहे.
मंगळवारी सकाळी या ४० मासेमारी नौका समुद्रात गेल्या होत्या. याची माहिती मिळताच त्या परत येण्याच्या वेळेआधी मत्स्यव्यवसाय खात्याचे पथक वरवडे जेटी येथे पोहोचले. मासेमारी करून परतलेल्या सर्व नौकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये मत्स्यव्यवसाय खात्याचे अधिकारी डी. जे. जाधव, कर्मचारी कृष्णसिंह रघुवंशी, सुरक्षा पर्यवेक्षक धीरज चव्हाण, तुषार करगुटकर, सुशील वैद्य आदींनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)
मत्स्यव्यवसाय खात्याची अन्य ठिकाणेही हिटलिस्टवर
रत्नागिरीसह जिल्ह्यातील किनारपट्टी भागात यांत्रिक नौकांद्वारे मासेमारी करून बंदी आदेशाचा भंग केला जात असल्याची चर्चा आहे. याबाबत मत्स्यव्यवसाय खात्याकडे तक्रारीही आल्या आहेत. मात्र मासेमारी करणाऱ्यांवर मत्स्यव्यवसाय खात्याकडून कारवाईच होत नसल्याने या खात्याकडूनच त्यांना अभय असल्याचा आरोप मच्छिमारांमधून केला जात आहे.