बेकायदेशीर नौकांवर कारवाई केवळ दिखाव्यापुरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 02:36 PM2020-10-05T14:36:27+5:302020-10-05T14:38:04+5:30
illegal boats, ratnagiri news, fishrman अवैध मासेमारी करणाऱ्या पर्ससीन व मिनी पर्ससीन नौका मालकांकडून मिळणारा हप्ता बंद होईल म्हणून थातूरमातूर कारवाई करण्यात येत आहे़,
रत्नागिरी : अवैध मासेमारी करणाऱ्या पर्ससीन व मिनी पर्ससीन नौका मालकांकडून मिळणारा हप्ता बंद होईल म्हणून थातूरमातूर कारवाई करण्यात येत आहे़, असा गंभीर आरोप आयुक्तांना निवेदनामध्ये करण्यात आला आहे़.
या नौका तत्काळ जप्त करुन अवैध मासेमारीला चालना देणाऱ्या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने महाराष्ट्र राज्याचे आयुक्त मत्स्य व्यवसाय अतुल पटणे यांच्याकडे केली आहे़
रत्नागिरीचे सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय यांच्या कार्यक्षेत्रात राजिवडा, मिरकरवाडा, मिऱ्या, साखरतर, वरवडे, जयगड, दाभोळ, साखरीनाटे बंदरात गेली अनेक वर्षे अवैध मिनी पर्ससीन मासोरी केली जात आहे़.
सुमारे ७०० पर्ससीन आणि मिनी पर्ससीन नौका ट्रॉलिंग, गीलनेट मासेमारी परवाने घेऊन मासेमारी करीत आहेत. तसेच काही नौका मासेमारी परवाने न घेता अवैध पर्ससीन मासेमारी करत आहेत, असे निवेदनामध्ये म्हटले आहे़.
दिनांक २८ सप्टेंबर रोजी मिरकरवाडा जेटी येथे दोन नौकांवर केवळ ३१ हजार रुपये रकमेची थातूरमातूर दंडात्मक कारवाई करुन त्यांना पुन्हा अवैध पर्ससीन मासेमारी करण्यास मोकळे सोडून दिले आहे़ आजघडीस त्या नौकांसह अन्य शेकडो पर्ससीन, मिनी पर्ससीन नौका मासेमारी करीत आहेत. परंंतु मत्स्य खात्याचे अधिकारी केवळ स्वार्थापोटी जाणीवपूर्वक अवैध मासेमारीला आळा घालत नसल्याचे म्हटले आहे.
अवैध मासेमारी सुरूच
५ फेबु्रवारी २०१५ रोजी पासून पर्ससीन मासेमारीवर कायद्याने अनेक निर्बंध घातले असले तरी देखील रत्नागिरी जिल्ह्यात कायदे मोडून अवैध मासेमारी सुरू आहे. पर्ससीन, मिनी पर्ससीन, एल़ई़ डी़ लाईटने पर्ससीन मासेमारी पूर्ण हंगाम सुरु आहे, असेही निवेदनात स्पष्ट केले आहे़