अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई
By admin | Published: July 15, 2017 03:26 PM2017-07-15T15:26:05+5:302017-07-15T15:26:05+5:30
माहिती देण्यास टाळाटाळ
आॅनलाईन लोकमत
देवरूख (जि. रत्नागिरी), दि. १५ : कोल्हापूरकडे विनापरवाना वाळूची वाहतूक करणाऱ्या तीन ट्रकचालकांवर देवरूख तहसील कार्यालयाने कारवाइ केली आहे.
देवरूखातील सावरकर चौक येथे काल (गुरुवारी) ही कारवाई करण्यात आली. देवरूखचे तहसीलदार संदीप कदम यांना अवैध वाळू वाहतुकीची माहिती मिळताच त्यांनी सहकाऱ्यांना घेत सावरकर चौक येथे सापळा रचला. यावेळी चिपळूणहून विनापरवाना अवैध वाळूची वाहतूक करणारे तीन ट्रक आढळून आले. यामध्ये (एमएच-०९ क्यू-५५१३), (एमएच-०४ पी ४८५६) व (एमएच-४३ इ ७१९६) या गाड्यांचा समावेश आहे. या गाड्या तहसील कार्यालयाने ताब्यात घेतल्या आहेत. मात्र, याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी संपर्क साधला असता माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली.
पाण्यात पडून तरूणाचा मृत्यू
राजापूर : बंधाऱ्यावर मासे पकडताना चक्कर आल्याने अविनाश अरुण घाडी (२२) याचा मृत्यू झाल्याची घटना राजापूर तालुक्यातील तळवडे गावी आज (शुक्रवारी) दुपारी दोन वाजता घडली. तळवडे येथील सिमेंट बंधाऱ्यामध्ये काही मित्रांसमवेत अरुण हा मासे पकडण्यासाठी गेला होता. यावेळी त्याला चक्कर आल्याने तो पाण्यात पडला. यावेळी बंधाऱ्यात पाणी जास्त असल्याने त्याचा मृत्यू झाला. याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून, या वर्षातील बुडून मृत्यू होण्याची तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे.
भरणेत पुलावरुन पडून कामगार गंभीर जखमी
खेड : मुंबई - गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामाला सध्या चांगलाच वेग आला आहे. महामार्गावरील भरणे येथील जगबुडी नदीवर बांधण्यात येत असलेल्या नव्या पुलावरून शुक्रवारी सकाळी ९च्या सुमारास कामगार खाली पडून गंभीर जखमी झाला. हेजापसिंग जगदीश मित्तल (५२) असे त्याचे नाव आहे. तो कोठे राहतो हे मात्र समजू शकलेले नाही. तोल गेल्याने तो खाली पडल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचा हात व पाय मोडला आहे. जोरदार मार लागल्याने तो रक्तबंबाळ झाला आहे. घटना घडताच १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
महामार्गावरील जगबुडी नदीवर चौपदरीकरणासाठी हा पूल बांधण्यात आहे. याच पुलावर हेजापसिंग काम करीत होता. पुलावर उभे राहण्यासाठी स्ट्रक्चर करण्यात आले होते, त्याचा एक भाग खाली गेल्याने तो सुमारे ४० फूट अंतरावर खाली कातळावर कोसळला. या घटनेने त्याचे सहकारी कामगारही हादरले. यावेळी तेथे खाली असलेले व रस्त्यावरील पादचाऱ्यांनी त्याला उचलून बाजूला ठेवले. त्यानंतर जवळच्याच रुग्णालयात हलवले.