साई रिसॉर्ट प्रकरणातील अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हावी, किरीट सोमय्यांची मागणी
By मनोज मुळ्ये | Published: November 12, 2022 11:27 AM2022-11-12T11:27:42+5:302022-11-12T11:28:35+5:30
प्रताप सरनाईक, भावना गवळी यांच्यावरील आरोपांवरुन सोमय्या यांचे घूमजाव
रत्नागिरी : बेकायदेशीर साई रिसॉर्ट उभारण्यात ज्या अधिकाऱ्यांचा हात आहे, त्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आपली आग्रही मागणी आहे. बेकायदेशीर प्रकरणातील एकालाही मोकळीक देणार नसल्याचे भाजपा नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
रत्नागिरीतील भाजपा कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी माजी पालकमंत्री व आमदार ॲड. अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली. ते पुढे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळातील बेकायदेशीर रिसॉर्ट प्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी आपला जबाब नोंदवला आहे. ६२ पानांचे पुरावे आपण पुन्हा पोलिसांना सादर केले आहेत. तसेच साई रिसॉर्ट तोडण्याची प्रक्रिया जोरात सुरु असून, ज्या दिवशी हे रिसॉर्ट तोडले जाईल त्यावेळी आपण स्वतः दापोलीत त्या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याचेही सोमय्या यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्री असताना ॲड. परब यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन बेकायदेशीर रिसॉर्टची उभारणी केली. त्याविरोधात आवाज उठवल्यानंतर सदानंद कदम यांना विक्री केल्याचे दाखवण्यात आले असून या प्रकरणातील खरेदी-विक्री केल्याचा तपशिल ॲड. परब यांनी का लपवला, असा प्रश्नही सोमय्या यांनी उपस्थित केला.
आव्हाडांवरील कारवाईचे समर्थन
'हर हर महादेव' चित्रपटाला जोरदार विरोध करीत चित्रपटगृहात प्रेक्षकांना दमदाटी करत धमकी दिल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई केली आहे. या कारवाईचे किरीट सोमय्या यांनी करून ही कारवाई योग्य. असल्याचे सांगितले. शिंदे-फडणवीस यांचे सरकार आले असून, ते चुकीचे काम करणार नसल्याचा विश्वास व्यक्त
सरकार गेल्याचे आव्हाड विसरले
जितेंद्र आव्हाड ठाकरे सरकारमध्ये मंत्री असताना कधीही, कोणाच्याही घरात घुसून शिवीगाळ, मारहाण करत असत आणि ठाकरे सरकार त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांचेच संरक्षण करत असे, असा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला. आता ते सरकार गेल्याचे आव्हाड विसरल्याची टीकाही त्यांनी केली.
सोमय्या यांचे घूमजाव
प्रताप सरनाईक, भावना गवळी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप सोमय्या यांनी केले होते. त्याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत आता विरोधकांनी पुढे यावे, असे सांगून घूमजाव केले. एकप्रकारे त्यांनी आरोप केलेल्यांना 'क्लिनचीट' दिली आहे.