सावर्डे, वाटूळ परिसरात राज्य उत्पादन शुल्काची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:32 AM2021-04-07T04:32:26+5:302021-04-07T04:32:26+5:30
वाटूळ (ता. राजापूर) येथील कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारसह एकाला ताब्यात घेतले आहे. लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : ...
वाटूळ (ता. राजापूर) येथील कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारसह एकाला ताब्यात घेतले आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात धाडसत्र सुरूच ठेवले असून, सावर्डे - काेष्टीवाडी (ता. चिपळूण) येथे हातभट्टीवर धाड टाकून ९७,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच वाटूळ (ता. राजापूर) येथे गावठी दारूची वाहतूक करणाऱ्या कारमधून ३०० लीटरची दारू जप्त करण्यात आली आहे. या दाेन्ही कारवाईत पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत हातभट्टी निर्मूलन कार्यक्रमांतर्गत विभागीय उपआयुक्त वाय. एम. पवार, अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक व्ही. व्ही. वैद्य यांनी अवैध दारूविरोधात मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत सातत्याने जिल्ह्यातील अनेक हातभट्टयांवर छापे मारून गावठी हातभट्टी दारूचा मोठा साठा व मुद्देमाल जप्त केला आहे. सावर्डे कोष्टीवाडी याठिकाणी दारू निर्मितीसाठी लागणारे जवळपास ३८०० लीटर रसायन आढळले. यावेळी दीपाली दिलीप वारे (४८), रेश्मी रवींद्र वारे (४९), मंजिरी मारूती भंडारी (३६), अशोक अनंत भंडारी (४९, सर्व रा. सावर्डे, ता. चिपळूण) यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९९४ अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
दुसऱ्या एका कारवाईत मुंबई - गोवा महामार्गावर गावठी दारूची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावर राज्य उत्पादन शुल्कच्या लांजा कार्यालयाने वाटूळ येथे उपनिरीक्षक अमित पाडाळकर यांनी सापळा रचला. यावेळी गावठी दारूची वाहतूक करणारी १ लाल रंगाची मारूती अल्टो कार आढळली. या कारवाईत ३०० लीटर गावठी दारू जप्त केली. वाहनासह १,०२,६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. वाहनचालक शुभम नरेंद्र पाटील (२६, रा. मिरजोळे) याला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई उपअधीक्षक व्ही. व्ही. वैद्य यांच्या नेतृत्त्वाखाली निरीक्षक शरद जाधव, सुरेश पाटील, उपनिरीक्षक अमित पाडाळकर, किरण पाटील, निखिल पाटील, जवान विशाल विचारे, अतुल वसावे, सावळाराम वड, ओंकार कांबळे, संदीप विटेकर, अनिता नागरगोजे यांनी केली.