‘त्या’ शिक्षकांवर होणार कारवाई
By admin | Published: February 17, 2016 11:43 PM2016-02-17T23:43:14+5:302016-02-18T21:30:19+5:30
शिक्षण विभागाकडून दखल: चिपळूण, राजापूर तालुक्यात आढळली होती शाळाबाह्य मुले
रत्नागिरी : जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार हे दौऱ्यावर असताना शाळाबाह्य मुले आढळून आल्याने शिक्षण विभागाकडून त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. ही मुले राजापूर व चिपळूण तालुक्यांत आढळली असून, त्याबाबत शिक्षकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार प्रत्येक मुलाला शिक्षण मिळाले पाहिजे व एकही मूल शाळाबाह्य असता कामा नये. त्यामुळे गरिबातला गरीब तसेच कामगारांची मुलेही शिक्षण प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने या कायद्याची अंमलबजावणी कठोरपणे व प्रभावीपणे राबविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
मागील महिन्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी देशभ्रतार दौऱ्यावर असताना निवळी तिठा येथे रस्ता कामगारांची शाळाबाह्य मुले आढळून आली होती. या प्रकरणी निवळी तिठा शाळेच्या मुख्याध्यापिकेवर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण जोरदार गाजले होते. त्या मुख्याध्यापिकेचे निलंबन मागे घेतल्यानंतर त्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले होते.
दरम्यान, बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकारी चिपळूण तालुक्याच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. रिक्टोली गावाची पाण्याबाबत पाहणी केल्यानंतर त्या परतत असताना त्यांना सावर्डे परिसरामध्ये शाळाबाह्य मुले आढळून आली. त्यावेळी त्यांनी त्या मुलांची विचारपूसही केल्याचे समजते.
बुधवारी जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी. हे राजापूर दौऱ्यावर गेले होते.
तेथे त्यांनाही शाळाबाह्य मुले आढळली. ही बाब त्यांनी शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणून दिली आहे.
आता जिल्ह्यातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच शाळाबाह्य मुले सापडल्याने संबंधित शिक्षकांवर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. (शहर वार्ताहर)