ग्रामकृतीदल सक्रिय करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:32 AM2021-04-20T04:32:17+5:302021-04-20T04:32:17+5:30

राजापूर : पहिल्या कोरोनाच्या लाटेत ग्रामकृतीदलाची भूमिका महत्त्वाची होती. त्यामुळे बाहेरून येणाऱ्यांवर लक्ष ठेवले जात होते. मात्र, दुसऱ्या लाटेत ...

Activate the village team | ग्रामकृतीदल सक्रिय करा

ग्रामकृतीदल सक्रिय करा

Next

राजापूर : पहिल्या कोरोनाच्या लाटेत ग्रामकृतीदलाची भूमिका महत्त्वाची होती. त्यामुळे बाहेरून येणाऱ्यांवर लक्ष ठेवले जात होते. मात्र, दुसऱ्या लाटेत बहुतांशी ग्रामकृतीदले सक्रिय नसल्याने गावोगावी येणाऱ्या नवीन नागरिकांची तपासणी होत नाही. त्यामुळेही सध्या कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे.

समुद्रकिनारे शांत

गुहागर : सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत असल्याने जिल्हा प्रशासनाने सक्तीचे लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे सर्व सार्वजनिक ठिकाणांवर फिरण्यालाही बंदी घातली आहे. सध्या समुद्रकिनारी येणारे थांबल्याने जिल्ह्यातील सर्व किनाऱ्यांवर सध्या शुकशुकाट पसरला आहे.

भाजीविक्री बंद

दापोली : शहरात ३० एप्रिलपर्यंत भाजी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय भाजी विक्रेत्यांकडून घेण्यात आला आहे. रविवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने भाजी विक्रेत्यांनी हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती संघटनेतर्फे देण्यात आली.

जिल्हा प्रशासनाचे आवाहन

रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनावर ताण येऊ लागला आहे. कोरोनाला थोपविण्याच्या अनुषंगाने विविध बाबींसाठी जिल्ह्यातील उद्योजकांनी सहकार्य करण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे या उद्योजकांनी ऑक्सिजन, औषधे, बेड सुविधा, चाचणी केंद्र आदींसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले जात आहे.

लसची प्रतीक्षा कायम

रत्नागिरी : जिल्ह्याला अजूनही कोरोना लसचा पुरवठा अनियमित तसेच अपुरा होत असल्याने जेमतेम लाखभर नागरिकांचेच लसीकरण झाले आहे. उर्वरित नागरिकांना अजूनही विविध केंद्रांवर हेलपाटे घालावे लागत आहेत. त्यामुळे लस मुबलक प्रमाणात कधी उपलब्ध होणार अशी विचारणा नागरिकांमधून केली जात आहे.

मळभाचे वातावरण

रत्नागिरी : वातावरणात दिवसेंदिवस बदल होऊ लागला आहे. सातत्याने होणाऱ्या या बदलांमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही प्रतिकूल परिणाम होत आहे. अधुनमधून मळभ दाटून येत असल्याने तापसरी, खोकला, पित्ताचे विकार अधिक बळावले आहेत. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असतानाच या आजारानेही डोके वर काढले आहे.

महाविद्यालयात कार्यक्रम

देवरुख : प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था आंबव संचलित इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी साडवली येथे फार्मसी कॉलेजचे प्रा. विपुल संसारे यांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. संस्थेचे चेअरमन रवींद्र माने यांनी संसारे यांचे कौतुक केले. प्राचार्य डॉ. बी.सी. हातपक्की, उपप्राचार्य डॉ. अमोल खाडे यांनीही संसारे यांना प्रेरणा दिली.

पर्यटनाला ग्रहण

दापोली : दरवर्षी एप्रिल, मे महिन्यांत तालुक्यातील विविध पर्यटन स्थळांकडे पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. मात्र, आता एप्रिल संपत आला तरीही सर्व पर्यटनस्थळे शांत झाली आहेत. लॉकडाऊनमुळे पर्यटन स्थळे बंद ठेवण्यात आल्याने पर्यटकांची पाठ फिरली आहे. कोरोनामुळे पर्यटनाला ग्रहण लागले आहे.

अहवालासाठी प्रतीक्षा

रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत भरमसाठ वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आरोग्य यंत्रणेला चाचण्या वाढविण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली असली तरी चाचण्यांचे अहवाल वेळेवर मिळत नसल्याने दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत आहे.

रक्तदान शिबिर

दापोली : सध्या कोरोनाच्या काळात रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी दापोली पंचायत समितीचे माजी सभापती किशोर देसाई यांच्या पुढाकाराने आसूद येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. आसूद गुरववाडी सभागृहात हे रक्तदान शिबिर घेण्यात आले. दात्यांनी या शिबिराला चांगला प्रतिसाद दिला.

Web Title: Activate the village team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.