अनिल परबांच्या अडचणीत वाढ, केंद्रीय समितीच्या पथकाने केली मुरुड येथील रिसॉर्टची पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 01:11 PM2022-07-15T13:11:20+5:302022-07-15T13:12:15+5:30
नवे सरकार सत्तेत आल्यानंतर तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे यातून पुढे आले आहे.
दापोली : तालुक्यातील मुरुड येथील साई रिसॉर्टबाबत काय कारवाई करण्यात आली आहे, याची माहिती घेण्यासाठी केंद्रीय समितीचे पथक गुरुवारी मुरुडमध्ये दाखल झाले आहे. नवे सरकार सत्तेत आल्यानंतर तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे यातून पुढे आले आहे.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांच्यावर पदाचा गैरवापर करून सीआरझेडचा भंग केल्याचा आरोप केला होता. त्यांच्या तक्रारीनंतर केंद्राच्या एका पथकाने सीआरझेडबाबत दापाेली तालुक्यातील मुरुड येथील रिसॉर्टची पाहणी केली आणि हे रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याचा अहवाल दिला होता. त्यामुळे हे रिसॉर्ट पाडण्याचे आदेश देण्यात आले होते.
हे आदेश देण्यात आल्यानंतर पुढे काय कारवाई झाली आहे, याची पाहणी करण्यासाठी केंद्राच्या पर्यावरण खात्याचे पाच जणांचे पथक गुरुवारी मुरुडमधल्या रिसाॅर्टवर दाखल झाले आहेत.
या पथकामध्ये चेन्नईमधील पर्यावरण संस्था आणि महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंटच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. साई रिसाॅर्टप्रमाणे सी कोच रिसाॅर्टचीही चौकशी या पथकाकडून केली जात असल्याची माहिती पुढे येत आहे.
राज्य पर्यावरण विभाग व केंद्र पर्यावरण विभाग अशा दोन्ही टीम प्रथमच एकत्र पाहणीसाठी आल्या आहेत. त्यांनी प्रांताधिकारी कार्यालयात माहिती घेतली.
साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश काही महिन्यांपूर्वी देण्यात आले होते. मात्र, त्यानंतर कारवाई थांबलीच होती. आता सरकार बदलल्यानंतर या कारवाईला गती आली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.