जिल्ह्यात ११६ नव्या कोरोना रुग्णांची भर; एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:33 AM2021-04-04T04:33:26+5:302021-04-04T04:33:26+5:30
रत्नागिरी : गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ११६ नव्या रुग्णांची भर पडली असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. बरे झालेल्या ...
रत्नागिरी : गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ११६ नव्या रुग्णांची भर पडली असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. बरे झालेल्या ४९ रुग्णांना घरी सोडण्यात आले तर ५४९ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी एकाच दिवसांत ६६८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्याची रुग्णसंख्या ११,३७८ इतकी झाली आहे.
फेब्रुवारी महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने जिल्ह्याची चिंता वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्ण वाढू लागले असून, शुक्रवारी एकदम १५५ रुग्ण सापडल्याने पुन्हा आरोग्य विभागावर ताण आला आहे. शनिवारी ११६ रुग्णांची नोंद झाली. यात आरटीपीसीआर चाचणीत ९७ तर ॲंटिजेन चाचणीत १९ जण पाॅझिटिव्ह आले आहेत. या रुग्णांमध्ये रत्नागिरी ३२, चिपळूण २१, संगमेश्वर २७, राजापूर १७, लांजात, गुहागर ८, खेड ६ आणि दापोली तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. खेड तालुक्यातील ७७ वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान २ मार्च रोजी मृत्यू झाला आहे. सध्या जिल्हा महिला रुग्णालयासह कळंबणी तसेच एका खासगी कोविड रुग्णालयात १२६ रुग्ण उपचार घेत असून कामथे, दापोली यांच्यासह अन्य चार खासगी डी.सी.ए.सी.मध्ये ४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ३ कोविड केअर सेंटरमध्ये ६६ तर गृह अलगीकरणात ३०९ असे एकूण ५४९ रुग्ण उपचार घेत आहेत.
आतापर्यंत ११,३७८ रुग्ण कोरोनाबाधित झाले असून एक लाख २०३२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. १०,२५३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत ३७८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात बाधित होणाऱ्यांचे प्रमाण १० टक्के असले तरी बरे होणाऱ्यांची टक्केवारी ९०.११ इतकी आहे, तर कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची टक्केवारी ३.३२ इतकी आहे.
जिल्ह्यात वेगाने संसर्ग वाढू लागला असल्याने सर्व नागरिकांनी कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी मास्क, सॅनिटायझर तसेच सुरक्षित अंतराचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.