बारमाही शेतीला कुक्कुटपालनाची जोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:33 AM2021-08-26T04:33:10+5:302021-08-26T04:33:10+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शहराजवळील नाचणे येथील विलास दत्ताराम मांडवकर गेली २५ वर्षे शेतीमध्ये विविध प्रयोग करीत उत्पादन ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : शहराजवळील नाचणे येथील विलास दत्ताराम मांडवकर गेली २५ वर्षे शेतीमध्ये विविध प्रयोग करीत उत्पादन घेत आहेत. बागायतीसह बारमाही शेती करीत असून शेतीला त्यांनी कुक्कुटपालन व्यवसायाची जोड दिली आहे. भातशेतीमध्येही त्यांनी विक्रमी उत्पादन घेतल्यामुळे गतवर्षीच्या खरीप हंगामात भात पीक स्पर्धेत तालुक्यात व्दितीय क्रमांक मिळविला.
दीड हेक्टर क्षेत्रावर भातशेती करीत असून, भात काढणीनंतर पालेभाज्या, पडवळ, भेंडी, कारली, वांगी, मिरचीचे उत्पादन घेत आहेत. याशिवाय भाताबरोबर काही क्षेत्रावर हळद लागवड केली आहे. आंबा, काजू, नारळ, केळी, सुपारी बागायती असून, उत्पन्न सुरू आहे. भाजीपाला पिकामध्ये जास्त नफा मिळत असल्याचे मांडवकर यांनी सांगितले.
कृषी विभागातर्फे घेण्यात आलेल्या भात पीक स्पर्धेत मांडवकर सहभागी झाले होते. एका गुंठ्याला ८४ किलो भाताचे विक्रमी उत्पन्न मिळविण्यात त्यांना यश आले असले तरी तालुकास्तरावर त्यांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. भातशेतीसाठी प्राधान्याने ते शेणखताचा वापर करीत आहेत. भात लावणीनंतर २० ते २२ दिवसांची रोपे असतानाच ते लागवड करीत आहेत. शिवाय लागवडीमध्ये दोन रोपांमधील अंतर २५ सेंटीमीटर ठेवत आहेत. दोन रोपांमधील योग्य अंतरामुळे वाढ चांगली होऊन उत्पादनात वाढ होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
पारंपरिक शेती करीत असतानाच आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब ते करीत आहेत. यांत्रिक अवजारांचा वापर करीत असल्याने श्रम व पैसा वाचतो. रासायनिक खतापेक्षा सेंद्रिय खते वापरण्यावर त्यांचा विशेष भर आहे. यासाठी कृषी अधिकारी गणेश जुवळे यांचे मार्गदर्शन लाभत असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजीपाल्यात जास्त नफा
भाज्यांना बारमाही मागणी असते. त्यामुळे भात काढणीनंतर पावसाळ्यात पुन्हा भाताची लागवड करेपर्यंत भाजीपाला लागवड मांडवकर करीत आहेत. वयाच्या ५८ व्या वर्षातही शेती करीत असताना ते प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करतात. पालेभाज्या, कोथिंबीर, पडवळ, भेंडी, कारली, वांगी, मिरची उत्पादन घेत आहेत. गावालगतच शहरामध्ये भाज्यांची विक्री सोपी होत आहे. सेंद्रिय पध्दतीने भाजीपाला उत्पादन घेत असल्यामुळे चांगले उत्पादन प्राप्त होत असून, दर्जाही चांगला असल्याने विक्री सोपी होऊन चांगला नफा मिळतो.
गोबर गॅस युनिट
काही दुभत्या गुरांचा सांभाळ केला आहे. त्यापासून दुधदुभते प्राप्त होते. शेणापासून शेणखतशिवाय गोबर गॅस युनिट बसविले आहे. गोबर गॅस युनिटमुळे इंधनाचा खर्च वाचत आहे. दूध विक्रीतून अर्थप्राप्ती होते. शिवाय शेणाचा वापर गोबर गॅससह खतासाठीही होतो. शेणखत वापरामुळे रासायनिक खतावरील खर्चाची बचत झाली आहे.
कुक्कुटपालनाची जोड
शेतीला कुक्कुटपालन व्यवसायाची जोड दिली आहे. काही मोजक्याच पक्ष्यांचा सांभाळ केला आहे. पक्षी, अंडी विक्रीतून उत्पन्न प्राप्त होते. शिवाय विष्ठेचा वापर खतासाठी केला जात असल्यामुळे विष्ठेला मागणी आहे. भविष्यात कुक्कुटपालन व्यवसाय वाढविणार असल्याचे मांडवकर यांनी सांगितले. त्यांना कृषी विभागाचे मार्गदर्शन लाभत आहे.
हळद लागवड
भाताबरोबर दोन गुंठे क्षेत्रावर मांडवकर यांनी हळद लागवड केली आहे. रासायनिक खते न वापरता सेंद्रिय खते वापरण्यात येत असल्याने हळद उत्पादन दर्जेदार होते. सणासुदीच्या काळात हळदीच्या पानांची विक्री होते. शिवाय हळद काढणीनंतर त्याची पावडर करून विक्री करीत असून, त्यांना चांगली मागणी होत आहे.