Aaditya Thackeray: आदित्य ठाकरे यांच्या कल्पना चांगल्या! अंमलबजावणीचे काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 07:02 PM2022-04-01T19:02:11+5:302022-04-01T19:16:03+5:30
केवळ पर्यटनातून जिल्ह्याचा विकास शक्य आहे. मात्र त्यात खूप अडचणी आहेत. अतिवृष्टी, पुरामुळे पावसाळ्यात पर्यटक कोकणात येत नाहीत. त्यामुळे पर्यटन हा बारमाही व्यवसाय होत नाही. त्याला उद्योगांची जोड गरजेची आहे.
मनोज मुळ्ये
रत्नागिरी : पर्यटनाच्या माध्यमातून कोकणाचा विकास, बीच शॅक्स, निवास न्याहरी योजनेबाबतचे धोरण या पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या कोकण दौऱ्यात मांडलेल्या याेजना उत्तम आहेत. कोकण हिताच्या आहेत; पण त्याच्या अंमलबजावणीबाबत तितकेच गांभीर्य दाखवले जाणे गरजेचे आहे. अनेकदा योजना उत्तम तयार होतात, मात्र अंमलबजावणीच्या स्तरावर त्याची गडबड होते आणि त्यातून कोणालाच फायदा होत नाही.
आदित्य ठाकरे यांनी तब्बल तीन दिवस रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी कोकणचा शाश्वत विकास या मुद्द्यावर भर दिला. इथले पर्यावरण, निसर्ग टिकवून स्थानिकांच्या हाताला काम मिळवून देणे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून पर्यटन विभाग आखत असलेल्या योजनांवर त्यांनी भाष्य केले. त्याचवेळी उद्योग, मोठे प्रकल्प याबाबतही त्यांनी सकारात्मक भूमिका मांडली. युवा पिढीतील नेतृत्त्वाकडून याच अपेक्षा आहेत.
मंत्री ठाकरे यांनी मांडलेल्या कल्पना, पर्यटन विभाग राबवणार असलेली धोरणे हे सर्व कागदावर चांगलेच आहे. पण त्या केवळ कागदावर चांगल्या असल्याने कोकणाचा विकास होणार नाही. त्यासाठी कदाचित मोठी आर्थिक तरतूदही होईल; पण जोपर्यंत त्याची अंमलबजावणी योग्य होत नाही, तोपर्यंत त्या फायद्याच्या ठरणार नाहीत. त्यासाठी योजनांचा पाठपुरावा करणारे लोकप्रतिनिधी, योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे सरकारी अधिकारी आणि लाभ घेणारे स्थानिक या साऱ्यांचा त्यातील प्रामाणिक सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. जर या गोष्टींकडेही आदित्य ठाकरे यांनी लक्ष ठेवले तर कोकणाच्या अर्थकारणाला वळण लागू शकेल, हे नक्की.
बीच शॅक्स धोरण लवकरच
कोकण दौऱ्यात सर्व ठिकाणी मंत्री आदित्य ठाकरे यांनी गोव्याच्या धर्तीवर बीच शॅक्स आणि होम स्टे (निवास न्याहरी योजना) यावर भर दिला. सीआरझेडमध्ये काही प्रमाणात शिथिलता गरजेची आहे. ती मिळाल्यानंतर बीच शॅक्सची उभारणी शक्य आहे. त्यासाठी राज्य सरकारने आपला प्रस्ताव तयार करून दिला आहे. त्यावर दोन महिन्यांत निर्णय अपेक्षित आहे.
पर्यटन बारमाही नाही, उद्योगाची जोड हवीच
केवळ पर्यटनातून जिल्ह्याचा विकास शक्य आहे. मात्र त्यात खूप अडचणी आहेत. अतिवृष्टी, पुरामुळे पावसाळ्यात पर्यटक कोकणात येत नाहीत. त्यामुळे पर्यटन हा बारमाही व्यवसाय होत नाही. त्याला उद्योगांची जोड गरजेची आहे.
होम स्टे पॉलिसी
- कोकणात येणाऱ्या पर्यटकांना घरगुती वातावरणात राहता यावे आणि स्थानिकांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी पर्यटन विकास महामंडळाकडून निवास न्याहरी (होम स्टे) योजना राबवली जाते.
- ज्या लोकांनी पर्यटकांची आपल्या घरी व्यवस्था केली आहे, त्यांना काही कर भरावे लागतात, त्यांना वीज बिल वाणिज्य स्वरुपाचे येते. त्यासाठी त्याचे एक धोरण निश्चित करण्याचे काम सुरू आहे.
- असा व्यवसाय करणार्यांना काही सवलती दिल्या जाणार आहेत. तसे झाल्यास हा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या वाढेल. थोडक्यात स्थानिकांना हक्काचे काम मिळेल.
मंत्री उदय सामंत यांचा विशेष पुढाकार
बीच शॅक्सबाबत मंत्री उदय सामंत गेला बराच काळ पाठपुरावा करत आहेत. गोव्याकडे जाणार्या पर्यटकांची पावले रत्नागिरी जिल्ह्यातच थांबवण्यासाठी गोव्यासारख्या योजना राबवणे गरजेचे आहे, हे ओळखून ते सतत बीच शॅक्सबाबत पाठपुरावा करत आहेत. त्यातून ती योजना आकाराला येत आहे. अर्थात अंमबजावणीकडे त्यांना विशेष लक्ष द्यावे लागेल, हे निश्चित.