सह्याद्रीची कला हिमालयाची उंची गाठणारी, विद्यार्थ्यांच्या शिल्पाकृती पाहून आदित्य ठाकरे झाले अचंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 06:54 PM2022-04-01T18:54:20+5:302022-04-01T18:55:16+5:30
कलाकारांच्या बोटात अक्षरशः जादू आहे. या कलाकृती पाहिल्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी घडविल्या आहेत, यावर विश्वास बसत नसल्याचे गौरवोद्गार आदित्य ठाकरे यांनी यावेळी काढले.
सावर्डे : ग्रामीण भागातील कलाकारांवर विविध पैलू पाडत त्यांच्यातील अचूक कलागुण ओळखून त्यांना दिशा देणे हे अभिनंदनीय कार्य आहे. यासाठी अथक प्रयत्न करणारे कोकणातील सह्याद्री शिक्षण संस्थेचे सह्याद्री कला महाविद्यालय म्हणजे युवा कलाकारांना घडविणारे एक कला विद्यापीठ आहे. सह्याद्रीमधील विद्यार्थ्यांची कला हिमालयाची उंची गाठणारी असल्याचे प्रतिपादन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी सावर्डे (ता. चिपळूण) चिपळूण येथे बोलताना केले.
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी कोकण दौऱ्यात चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील सह्याद्री कला महाविद्यालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी सह्याद्री कला महाविद्यालयातील कलादालन आणि युवा कलाकारांनी घडविलेल्या शिल्पाकृती पाहिल्या. येथील कलाकारांच्या बोटात अक्षरशः जादू आहे. या कलाकृती पाहिल्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी घडविल्या आहेत, यावर विश्वास बसत नसल्याचे गौरवोद्गार आदित्य ठाकरे यांनी यावेळी काढले. शिल्पकला विभागाच्या अनिकेत बोंबले याने घडविलेल्या कुस्तीतील धोबीपछाड या शिल्पाचे त्यांनी विशेष कौतुक केले आणि अशा प्रकारचे शिल्प मुंबईत असायला हवे, अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.
सह्याद्रीमधील युवा कलाकारांसह मान्यवर कलाकारांच्या कलाकृती आदित्य ठाकरे यांनी अत्यंत बारकाईने पाहून आपण मंत्रमुग्ध झाल्याचे ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश राजेशिर्के यांना यावेळी सांगितले. सह्याद्री कला महाविद्यालयाच्या प्रगतीबाबत कार्याध्यक्ष आमदार शेखर निकम, कला महाविद्यालयाचे अध्यक्ष ज्येष्ठ चित्रकार प्रकाश राजेशिर्के, प्राचार्य माणिक यादव यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना माहिती दिली. तसेच राबविण्यात येणाऱ्या कलाविषयक उपक्रमांबाबत माहिती दिली.
यावेळी कला महाविद्यालयातर्फे आदित्य ठाकरे यांना एक कलाकृती भेट देण्यात आली. आमदार शेखर निकम यांनी स्वागत केले. यावेळी खासदार विनायक राऊत, उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, पालकमंत्री अनिल परब, आमदार राजन साळवी, विक्रांत जाधव उपस्थित होते.
माेझॅक कलाकृतीचे काैतुक
सह्याद्री कला महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ युवा कलाकारांनी उभारलेल्या १५ फूट रुंद आणि २५ फूट उंच मोझॅक कलाकृतीचे कौतुक केले. ही कलाकृती उभारणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. यासर्व कलाकारांसोबत आदित्य ठाकरे यांनी छायाचित्रही काढायला लावले.