समायोजन, लोकसहभागातून अन्य शाळांचा विकास : इंदुराणी जाखड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:33 AM2021-07-27T04:33:37+5:302021-07-27T04:33:37+5:30
रत्नागिरी : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी जिल्हा परिषद आदर्श आंतरराष्ट्रीय शाळा अंजनवेल नं. २ जिल्ह्यातील अनेक शाळांसाठी हे एक आदर्श ...
रत्नागिरी : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी जिल्हा परिषद आदर्श आंतरराष्ट्रीय शाळा अंजनवेल नं. २ जिल्ह्यातील अनेक शाळांसाठी हे एक आदर्श उदाहरण आहे. समायोजन आणि लोकसहभाग यातून जिल्ह्यातील अन्य शाळांचा विकास करण्याचा मानस जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी इंदुराणी जाखड यांनी व्यक्त केला.
जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव व मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांनी गुहागर तालुक्यातील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी जिल्हा परिषद आदर्श आंतरराष्ट्रीय शाळा अंजनवेल नं. २ ला भेट दिली. लोकसहभागातून शालेय नेतृत्व विकासाचे व शाळेच्या वाढत्या पटसंख्येचे मुख्य कार्यकारी अधिकारी जाखड यांनी कौतुक केले. अंजनवेल नं. २ शाळेला ‘मॉडेल स्कूल’ म्हणून मान्यता मिळाली आहे, त्यासाठीच्या विविध नावीन्यपूर्ण योजनांची, शालेय इंटेरिअर कसे असावे, याची माहिती देत, त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
निर्मल ग्रुप ग्रामपंचायतीने शाळेला दिलेली शंभर गुंठे जमीन, मुलांच्या सुरक्षित प्रवासासाठी दिलेल्या तीन स्कूल बस यामुळे शाळेची पटसंख्या वाढत आहे. यासाठी ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ, शिक्षकांकडून दिल्या जाणाऱ्या योगदानाबद्दल कौतुक केले. शाळेने राबविलेल्या पहिले पाऊल, कोरोना काळातील यशोगाथा, पहिलीच्या एकात्मिक पाठ्यपुस्तकाचा किलबिल पथदर्शी प्रकल्प, ब्रीज कोर्स या उपक्रमांबद्दलही समाधान व्यक्त केले.
यावेळी शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे, उपशिक्षणाधिकारी संदेश कडव पंचायत समिती सभापती पूर्वा निमुणकर, उपसभापती सीताराम ठोंबरे, गटविकास अधिकारी अमोल भोसले, सहायक गटविकास अधिकारी प्रकाश भोसले, अंजनवेलचे केंद्रप्रमुख अशोक गावणकर, माजी सरपंच यशवंत बाईत, माजी उपसरपंच आत्माराम मोरे उपस्थित होते. स्वागत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय मिशाळ, सूत्रसंचालन अवधूत राऊतराव तर शालेय यशोगाथेचे सादरीकरण मुख्याध्यापिका ममता विचारे यांनी केले.
-------------------------
गुहागर तालुक्यातील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी जिल्हा परिषद आदर्श अंजनवेल नं. २ आंतरराष्ट्रीय शाळेस जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव व मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांनी भेट दिली. शाळेतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी जाखड यांचा सत्कार करण्यात आला.