एका टँकरने प्रशासनाची कसरत

By admin | Published: May 3, 2016 11:33 PM2016-05-03T23:33:00+5:302016-05-04T00:54:43+5:30

गुहागर तालुका : दोन वर्षानंतरही प्रशासनाची पाणीपुरवठ्याची तीच यंत्रणा--लोकमत विशेष

Admin workout with a tanker | एका टँकरने प्रशासनाची कसरत

एका टँकरने प्रशासनाची कसरत

Next

संकेत गोयथळे -- गुहागर तालुक्यामध्ये दरवर्षीचा टंचाई कृती आराखडा व त्यामधील वाड्यांची दुर्गम स्थिती व मोठे अंतर लक्षात घेता किमान दोन टँकरने पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे. गेली दोन वर्षे एकाच टँकरने पाणीपुरवठा होत असल्याने मोठी कसरत करावी लागत होती. यावेळीही चार गावे व बारा वाड्यांना एप्रिलपासूनच टँकरने पाणीपुरवठा गुहागर पंचायत समिती करत आहे.
गेल्या काही वर्षांचा आढावा घेता तालुक्यातील साखरीत्रिशूळ गावामध्ये पहिल्या टँकरची मागणी होते. यापाठोपाठ धोपावे गावाला दरवर्षी टँकरने पाणीपुरवठा केला जातो. तालुक्याची भौगोलिक स्थिती लक्षात घेता अनेक गावे व वाड्यावस्त्या या दुर्गम भागात वसलेल्या आहेत. अशा स्थितीत प्रशासनाला टँकरने पाणीपुरवठा करताना कसरत करावी लागते. एकावेळी एका भागात किंवा गावातच पाणीपुरवठा केल्यानंतर त्याच दिवसामध्ये अन्य ठिकाणी पाणीपुरवठा करणे मोठ्या अंतरामुळे शक्य होत नाही.
तालुक्याची भौगोलिक परिस्थिती व टंचाईग्रस्त गावांमधील वाड्यांची संख्या लक्षात घेता किमान दोन टँकर मिळणे आवश्यक आहेत. मागील दोन वर्षांचा विचार करता व भास्कर जाधव राज्यमंत्री असतानाही एकाच टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. अलोरे येथील महाराष्ट्र उपअभियंता यांत्रिकी क्र. १ अलोरे विभागाकडून गेले दोन वर्षे टँकर उपलब्ध न झाल्याने बांधकाम विभागाच्या डम्परवर ५ हजार लीटरची टाकी बसवून पाणीपुरवठा करण्यात येत होता. यावेळी अलोरे उपअभियंता यांत्रिकी क्र. १ कडून टँकर उपलब्ध झाला. मात्र, बांधकाम विभागाच्या डम्परवरील चालक दीर्घकालीन सुटीवर गेल्याने दुसरा टँकर उपलब्ध असूनदेखील चालक उपलब्ध नसल्याने सध्या केवळ एकाच टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या टँकरवर पंचायत समितीच्या बोलेरो वाहनावर असलेल्या चालकांना पाठविण्यास तहसील कार्यालयातून सांगितले जात आहे. मात्र, छोटे वाहन चालविणारे चालक डंपर चालविण्यास तयार नाहीत.
तालुक्यातील साखरीत्रिशूळ व धोपावे या गावांनी प्रथम टँकरची मागणी केली. साखरीत्रिशूळ मधील सात वाड्यांपैकी म्हसकरवाडी व मोहल्ला येथे गतवर्षी जलयुक्त शिवार योजनेतून बंधारा बांधल्याने येथील विहिरींतील पाण्याची पातळी राखण्यात यश आले आहे. मात्र, गवळवाडी, सुतारवाडी, बौध्दवाडी, तेलीवाडी या वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. या वाड्यांची एकूण लोकसंख्या ४८५ असून, याठिकाणी दोन दिवसाआड टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
धोपावे गावात जलशिवार योजना राबवूनही टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. गावातील जाधववाडी, पाटीलवाडी, गुढेकरवाडी, विघ्नहर्तावाडी, हनुमानवाडी या वाड्यांमध्येही टँकरने पाणीपुरवठा होत आहे.
वेळणेश्वर भाटीमध्ये १३३ कुटुंबे तर कोंडकारुळ, बुधाल, येभाडे येथेही प्रशासनाकडून पाणीपुरवठा केला जात आहे. एका टँकरने या सर्व ठिकाणी पाणीपुरवठा करणे शक्य होत नसल्याने अद्यापही पालशेत व निवोशीमधील १२० ग्रामस्थ टँकरपासून वंचित आहेत.
पंचायत समितीकडे निवोशी मधील ग्रामस्थांकडून वारंवार टँकरची मागणी केली जात आहे. यात आता शिवणे गावातील चार वाड्यांची भर पडली आहे. गतवर्षी एकही विंधन विहीर झाली नसल्याने गतवर्षीचीच पाणीटंचाईची परिस्थिती कायम आहे. शिवणे गावासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेमधून ३३ लाखांची पाणी योजना प्रस्तावित असून, अद्याप तिला मंजुरी मिळालेली नाही. यामुळे या गावातील ९ वाड्यांतील १०२७ ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

कृती आराखडा : दोन टँकर मंजूर, तरीही...?
तालुक्याच्या टंचाई कृती आराखड्यात ११ गावे व ४४ वाड्यांचा समावेश आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या मंजुरीमध्ये शिवणे गावातील चार वाड्यांना मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे मागणी असलेल्या ९ वाड्यांपैकी पाच वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचे निश्चित झाले असून, चार वाड्यांचा प्रश्न अंधारातच आहे. यातच तालुक्यासाठी दोन टँकर मंजूर असताना केवळ एकाच टँकरने पाणीपुरवठा होत आहे.

Web Title: Admin workout with a tanker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.