देशमुख यांच्या उपोषणाबाबत प्रशासन बेदखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:22 AM2021-07-11T04:22:17+5:302021-07-11T04:22:17+5:30
रत्नागिरी : गेल्या सहा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्यायग्रस्त लिपिक -टंकलेखक विलास देशमुख यांचे साखळी उपोषण सुरू आहे. मात्र, जिल्हा ...
रत्नागिरी : गेल्या सहा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्यायग्रस्त लिपिक -टंकलेखक विलास देशमुख यांचे साखळी उपोषण सुरू आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाला त्यांच्या या उपोषणाची दखल घेण्याची गरज वाट नाही. मात्र, आता आफ्रोहचे अन्य सदस्यही उपोषणासाठी पुढे सरसावले आहेत.
अधिसंख्य पदाचे आदेश मिळण्यासाठी अन्यायग्रस्त लिपिक -टंकलेखक विलास देशमुख यांनी आफ्रोहच्या माध्यमातून सोमवारपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला प्रारंभ केला आहे. यात त्यांचे कुटुंबही सहभागी आहे. देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी आफ्रोहच्या पुढाकाराने साखळी उपोषण सुरू केले आहे. मात्र, या आंदोलनाची दखल घेण्याची गरज जिल्हा प्रशासनाला वाटत नाही. त्यामुळे शनिवारी सहाव्या दिवशीही हे आंदोलन सुरूच आहे.
आता विलास देशमुख यांच्यासोबत उपोषणाला बसण्यासाठी आफ्रोहचे ठाणे येथील सदस्य शनिवारी रत्नागिरीत दाखल झाले. आफ्रोह ठाणेचे उपाध्यक्ष अर्जुन मेस्त्री, प्रकाश कोळी, चंद्रशेखर ठाणेकर, दीपेश तांडेल, मंडणगडचे सदस्य देवकीनंदन सपकाळे, आफ्रोहचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र पौनीकर, सचिव बापूराव रोडे, महिला आघाडीच्या मंगला रोडे, सुनंदा देशमुख उपस्थित होते. यावेळी ठाणे आफ्रोहच्या पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. ठाणे आफ्रोहच्यावतीने विलास देशमुख यांचे शाल व पुप्षगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
देशमुख यांचे उपोषण गेले सहा दिवस सुरू आहे. मात्र, याबाबत जिल्हा प्रशासनाकडून कोणतीच दखल गेली नसल्याची खंत आफ्रोहच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.