पूरप्रवण, दरडप्रवण वस्त्यांना प्रशासनाच्या नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:21 AM2021-06-11T04:21:45+5:302021-06-11T04:21:45+5:30
खेड : अतिवृष्टीचा इशारा असल्याने खेड तालुक्यातील अठरा गावांतील बाधित होण्याची शक्यता असलेल्या ८५८ कुटुंबांतील २ हजार ८६९ लोकांचे ...
खेड : अतिवृष्टीचा इशारा असल्याने खेड तालुक्यातील अठरा गावांतील बाधित होण्याची शक्यता असलेल्या ८५८ कुटुंबांतील २ हजार ८६९ लोकांचे स्थलांतरित होण्याच्या नोटीस महसूल प्रशासनाने दिल्या आहेत. या स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबांची तात्पुरत्या निवासाची सोय गावातीलच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व काही ठिकाणी खासगी बंद घरात करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात दिनांक १० ते १२ जून कालावधीत हवामान खात्याने मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवल्याने जिल्ह्यातील नदी किनाऱ्यावरील अनेक गावांना पुराच्या धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. खेड तालुक्यातील अठरा गावांतील ८५८ कुटुंबांना पूर रेषेत येत असल्याने संभावित धोका ओळखून तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्याच्या नोटीस तालुका प्रशासनाने दिल्या आहेत. तालुक्यातील खेड शहर, भोस्ते, आंजणी, मेटे, शिव बुद्रुक, शिव खुर्द, आष्टी मोहल्ला, आष्टी बुद्रुक, तुंबाड, बोरघर, पन्हाळजे, कर्जी, आमशेत, होडखाड, कोंडवाडी, अलसुरे, कर्जी, सुसेरी, चिंचघर, प्रभुवाडी या गावांमधील सुमारे साडेआठशे कुटुंबांना स्थलांतरित करण्याच्या नोटीस देण्यात आल्या आहेत. खेडचे उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घेऊन त्या गावांची पाहणी करायलादेखील सुरुवात केली आहे. पूरप्रवण क्षेत्र असलेल्या खेडमधील अलसुरे गावातील मोहल्ल्यात पाहणी केली असता, मोहल्ल्यातील ६ कुटुंबांना स्थलांतरित होण्याच्या नोटीस दिल्या गेल्या आहेत. या गावासह, चिंचघर, प्रभुवाडी, कर्जी, सुसेरी या गावातील लोकांनादेखील सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या नोटीस प्रशासनाने दिल्या आहेत. त्यापैकी अलसुरे गावाला दरवेळी अतिवृष्टीत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अतिवृष्टीत या गावाती कुटुंबांचा संपर्क तुटतो. यावर्षी हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा मिळाल्यानंतर प्रशासनाने स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या आहेत. गावातील जिल्हा परिषद शाळा आणि सुरक्षित अंतरावरील काही बंद घरांमध्ये ग्रामस्थांची राहण्याची व्यवस्था केली आहे. गावातील वृद्ध, नागरिक, लहान मुले आणि आजारी लोकांना प्राधान्याने स्थलांतरित करण्याची प्रक्रिया बुधवार, दि. ९ रोजी सुरू झाली होती.
---------------------
२००५ च्या कटू आठवणी
२००५ मध्ये पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीत खेड तालुक्यातील अलसुरे गावातील मोहल्ल्याला पुराचा वेढा पडला होता. तब्ब्ल १५ दिवस येथील ग्रामस्थांसोबत संपर्क तुटला होता. जगबुडी नदीकिनारी असलेल्या या वस्तीत लोक एका मशिदीच्या छतावर इतके दिवस जीव वाचवण्यासाठी राहिले होते. त्यामुळे कधीही अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला की, येथील ग्रामस्थांच्या त्या कटू आठवणी पुन्हा ताज्या होतात.
-----------------------------
अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे खेड तालुक्यातील अलसुरे गावातील कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे़