चिपळूण बुडविण्याचा प्रशासनाचा डाव, बचाव समितीचा गंभीर आरोप; २६पासून बेमुदत आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 12:26 PM2023-01-18T12:26:27+5:302023-01-18T12:34:42+5:30

चिपळूण पूर आणि कोळकेवाडी अवजल अभ्यास गटाच्या अहवालात ज्या शिफारशी, निरीक्षण नोंदविण्यात आले, त्यावरही समितीचा आक्षेप कायम

Administration plan to sink Chiplun, rescue committee serious allegation | चिपळूण बुडविण्याचा प्रशासनाचा डाव, बचाव समितीचा गंभीर आरोप; २६पासून बेमुदत आंदोलन

संग्रहीत फोटो

Next

चिपळूण : आतापर्यंत पहिल्या टप्प्यातील १० टक्केच गाळ उपसा झाला आहे. अजूनही ९० टक्के गाळ शिल्लक आहे. जलसंपदा विभागच नव्हे तर महसूलसह संबंधित सारेच विभाग गाळ उपशासाठी अथवा त्यांच्या आवश्यक परवानग्या, रेखांकनासह तत्सम कामासाठी एकमेकांकडे बोट दाखवत चालढकल करीत आहेत. प्रशासनाकडून चिपळूण डुबवण्याचा डाव जाणीवपूर्वक रचला जात असल्याचा गंभीर आरोप चिपळूण बचाव समितीने मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. यावेळी २६ जानेवारीपासून बेमुदत आंदोलन सुरू केले जाणार असल्याची माहिती दिली.

चिपळूण बचाव समितीचे बापू काणे, अरुण भोजने, राजेश वाजे, किशोर रेडीज, उदय ओतारी, शहानवाज शहा, महेंद्र कासेकर आदींनी वाशिष्ठी नदीतील गाळ उपशाची सद्य:स्थिती आणि प्रशासनाकडून सुरू असलेला वेळकाढूपणा याविषयी संताप व्यक्त केला. मुळातच जलसंपदा पहिल्या टप्प्यातील गाळ उपशाची आकडेवारी मोठी देत असली तरी ती पूर्णतः खोटी आहे.

मोडक समितीचा अहवालही दिशाभूल करणारा आहे. अजूनही एकूण गाळ उपशाच्या केवळ १० टक्केच काम झाले आहे. नदीपात्रातील गाळाची बेटे अजूनही काढलेली नाहीत. अलीकडच्या काळात विस्तारलेली मात्र खासगी सांगितल्या जाणाऱ्या बेटांचे रेखांकन अजूनही केलेले नाही. प्रत्येक वेळी गाळ उपशासंदर्भात होणाऱ्या तक्रारी आणि त्यासाठी आवश्यक परवानग्या, यासंबंधातील प्रत्येक विभाग हे एकमेकांकडे बोट दाखवीत आहेत.

चिपळूण पूर आणि कोळकेवाडी अवजल अभ्यास गटाच्या अहवालात ज्या शिफारशी, निरीक्षण नोंदविण्यात आले, त्यावरही समितीचा आक्षेप कायम आहे. किंबहुना या अहवालाविरोधात वेळप्रसंगी न्यायालयाचेही दरवाजे ठोठावण्याची आमची तयारी सुरू आहे. गाळाने भरलेल्या नद्या पूर्वस्थितीत आणण्याचे एकीकडे अहवालात म्हटले आहे. तरीही त्याकडे जलसंपदा विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. अधिकाऱ्यांना पुराचे गांभीर्य नसल्याने गाळ काढण्यास चालना मिळत नसल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

सतीश कदमांनीच चौकट मोडली

चिपळूण बचाव समिती सदस्य सतीश कदम, बापू काणे यांनी समितीची चौकट मोडल्याचा आरोप केला होता. यावर किशोर रेडीज म्हणाले, वास्तविक सतीश कदमांनीच पहिल्यांदा चौकट मोडली. दिवाळीनंतर ते समितीच्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. समितीला विश्वासात न घेता मोडक समितीच्या अहवालाला पाठिंबा दिला. येथे कोणी अध्यक्ष नाही अथवा पदाधिकारी. सर्वजण एक कुटुंब म्हणून काम करतोय.

Web Title: Administration plan to sink Chiplun, rescue committee serious allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.