राजापुरातील, लांजातील लघु पाटबंधारे याेजनांना प्रशासकीय मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:32 AM2021-04-04T04:32:04+5:302021-04-04T04:32:04+5:30
राजापूर : आमदार राजन साळवींच्या प्रयत्नाने लांजा तालुक्यातील लघु पाटबंधारे योजना हर्दखळे व राजापूर तालुक्यातील परुळे व गोपाळवाडी या ...
राजापूर : आमदार राजन साळवींच्या प्रयत्नाने लांजा तालुक्यातील लघु पाटबंधारे योजना हर्दखळे व राजापूर तालुक्यातील परुळे व गोपाळवाडी या लघु पाटबंधारे योजनांच्या विशेष दुरुस्तीसाठी रुपये ८ कोटी ४४ लाखांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
हर्दखळे, परुळे, गोपाळवाडी लघु पाटबंधारे योजना नादुरुस्त असून, गळती लागली असल्याने याबाबत आमदार राजन साळवी यांनी जलसंधारण मंत्री यांच्याकडे मागणी करून अनेक वेळा पाठपुरावा केला होता, तसेच अधिवेशन दरम्यान याबाबत अनेक वेळा शासनाच्या निदर्शनास आणले होते. त्या अनुषंगाने लघु पाटबंधारे याेजना परुळे, गोपाळवाडी, हर्दखळे या योजनांच्या विशेष दुरुस्तीसाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. लघु पाटबंधारे योजना परुळे या योजनेच्या विशेष दुरुस्तीसाठी ३,०२,६८,९७२ रुपये इतक्या किमतीची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. दुरुस्ती केल्यानंतर धरणाची साठवण क्षमता पुनर्स्थापित होणार असून, या प्रकल्पांतर्गत १४७ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
तसेच गोपाळवाडी या योजनेच्या विशेष दुरुस्तीसाठी ३,१२,९७,२९६ रुपये इतक्या किमतीची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. दुरुस्ती केल्यानंतर धरणाची साठवण क्षमता पुनर्स्थापित होणार आहे व १३३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे, तसेच हर्दखळे या योजनेच्या विशेष दुरुस्तीसाठी २,२८,३८,२७८ रुपये इतक्या किमतीची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. दुरुस्ती केल्यानंतर धरणाची साठवण क्षमता पुनर्स्थापित होणार आहे व १५० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
या योजनांची दुरुस्तीमुळे प्रकल्पांना लागलेली गळती थांबणार असून, धरणाची साठवण क्षमता पुनर्स्थापित होऊन क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याने संबंधित लाभधारक ग्रामस्थ व शेतकरी यांनी समाधान व्यक्त केले आहे.