पाणीटंचाईग्रस्त गावांना प्रशासनाचा दिलासा
By admin | Published: May 14, 2016 11:49 PM2016-05-14T23:49:11+5:302016-05-14T23:49:11+5:30
संगमेश्वर तालुका : संयुक्त पाहणी करून पाण्याची व्यवस्था...
देवरुख : दिवसेंदिवस पारा जसा वाढत आहे, तसतशी पाण्याची पातळीदेखील जलदगतीने घटत आहे. परिणामी संगमेश्वर तालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष दिवसेंदिवस वाढत आहे. पाणीटंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांमध्ये अजून वाढ होत आहे. याबाबत ‘लोकमत’ने ‘दुष्काळ दाह’ सदराखाली विशेष वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल संगमेश्वर तालुक्यातील प्रशासनाला घेतली आणि याबाबत तत्काळ संयुक्त पाहणी करुन मागणी असलेल्या गावांना पाण्याची व्यवस्था केली.
‘लोकमत’मध्ये ‘यंदा १५ दिवस आधीच पाणीटंचाई संगमेश्वरात हजारो तहानलेल्या जीवांना अवघे दोन टँकर’ अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. पाणी टंचाईग्रस्त गावांची संयुक्त पाहणी तीन विभागांची असल्याने या प्रक्रियेला विलंब लागतो, असे या वृत्तात नमूद करण्यात आले होते. याची दखल तालुका प्रशासनाने घेतली असून, नायब तहसीलदारांनी तत्काळ पाणीटंचाईबाबत अहवाल तयार करुन संयुक्त पाहणी केली आणि मुर्शीसह इतर गावांमध्ये टँकर सुरु करण्यात आला. प्रशासनाने लागलीच टँकर सुरु केल्यामुळे पाणीटंचाईग्रस्त गावांमधील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. ग्रामस्थांनी तहसील, गटविकास अधिकारी आणि पाणीपुरवठा विभागाला धन्यवाद दिले असून, ‘लोकमत’चे आभार मानले आहेत.
संगमेश्वर तालुक्यामध्ये सध्या ११ गावे आणि १७ वाड्यांना २ शासकीय टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आजपर्यंत टंचाईग्रस्त गावांना एकूण ७१ फेऱ्या टँकरच्या देण्यात आल्या आहेत. पाचांबे, पुर्येतर्फे देवळे, बेलारी बु., कनकाडी, शृंगारपूर, ओझरे खुर्द, मावळतवाडी, निवे खुर्द - चर्मकारवाडी, बौद्धवाडी, भडकंबा-बौद्धवाडी, तळवडे खाणचीवाडी, शेनवडे गवळवाडी, कुचांबे येडगेवाडी या ११ गावांतील १७ वाड्यांना दोन शासकीय टँकरने एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
ग्रामस्थ त्रस्त
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा नजीकच्या मुर्शी गावातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. याठिकाणी ग्रामस्थांना मैलोन्मैल पायपीट करून पाणी आणावे लागत आहे. वाढत्या उष्म्यामुळे आणि त्यातच पाणीटंचाई असल्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.