पोलिसांचे प्रशासकीय कामकाजही रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:33 AM2021-04-20T04:33:01+5:302021-04-20T04:33:01+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोना आल्यापासून आरोग्य यंत्रणेइतकाच पोलिसांवरील ताणही वाढला आहे. लोकांच्या मनात पोलिसांबद्दल आदर किंवा भीती ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोना आल्यापासून आरोग्य यंत्रणेइतकाच पोलिसांवरील ताणही वाढला आहे. लोकांच्या मनात पोलिसांबद्दल आदर किंवा भीती असण्यापेक्षा नकारात्मक भावनाच अधिक आहेत. पण कोरोना काळात लॉकडाऊनमुळे पोलिसांचे हाल वाढले आहेत. संचारबंदीची अंमलबजावणी अधिक कडक व्हावी यासाठी सातत्याने रस्त्यावरच असलेल्या पोलिसांना आपले प्रशासकीय कामही आता रस्त्यावरची ड्युटी करतानाच उरकावे लागत आहे.
सैल सोडले तरीही आणि कडक वागले तरीही पोलीस कायमच लोकांच्या टीकेचे धनी होतात. पण त्याचवेळी त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या कामाकडे मात्र लोकांचे दुर्लक्षच होत असते. रत्नागिरीत ठिकठिकाणी बंदोबस्तासाठी दिवसरात्र राबणारे पोलीसही माणसेच आहेत, याचा सोयीस्कर विसर लोकांना पडतो.
गेल्या वर्षीपासून पाेलिसांवरचा ताण वाढला आहे. यंदा शिमगोत्सवापासून कोरोनाने पुन्हा उग्र रूप धारण केले आहे. त्यामुळे राज्य शासनाने संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीमुळे हा ताण अधिकच वाढला आहे. दिवसभर कडकडीत उन्हात रस्त्यावर उभे राहून प्रत्येक गाडीची तपासणी करूनच पुढे पाठविली जात आहे. अनावश्यक फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे.
कायदा व सुव्यवस्था राखणे, संचारबंदीचे तंतोतंत पालन होण्यावर भर देणे या साऱ्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांचा बराचसा वेळही रस्त्यावरच जात आहे. मात्र, एकीकडे बंदोबस्त व दुसरीकडे अत्यावश्यक प्रशासकीय कामे याची सांगड घालत रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाचे निरीक्षक अनिल लाड बंदोबस्त सुरू असतानाच प्रशासकीय कामांचा निपटारा करीत आहेत.