राजापूर तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींवर प्रशासक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:33 AM2021-04-28T04:33:21+5:302021-04-28T04:33:21+5:30
राजापूर : एप्रिल २०२१ दरम्यान मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका एप्रिल, मे दरम्यान होणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले ...
राजापूर : एप्रिल २०२१ दरम्यान मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका एप्रिल, मे दरम्यान होणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले हाेते. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामध्ये राजापूर तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींचा समावेश असून, या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. त्यामुळे २६ एप्रिलपासून या ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकीय राजवट सुरू झाली आहे.
ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रशासकीय कामकाज सुरू केले होते. त्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीची प्रभाग रचना व आरक्षण काढण्याचे आदेश दिले होते. मात्र, कोरोनाच्या पाॅझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींमध्ये तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींचा समावेश होता. यामध्ये आंगले, भालावली, देवाचेगोठणे, केळवळी, मूर, राजवाडी, सागवे, वडदहसोळ, मोगरे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ९ ग्रामपंचायतींवर शासनाच्या आदेशानुसार प्रशासक नेमण्यात आले आहेत. ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊन सरपंच निवडीपर्यंत प्रशासकीय राजवट सुरू राहणार आहे. या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण जाहीर झाल्याने येथील राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केली होती. मात्र, या पंचवार्षिक निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याने राजकीय पक्षांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.