कोरोना लक्षणे नसलेल्या रुग्णास तत्काळ विलगीकरण केंद्रात दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:21 AM2021-06-11T04:21:57+5:302021-06-11T04:21:57+5:30
पावस : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गावात लक्षणे नसलेला कोरोना रुग्ण सापडल्यास त्याला तत्काळ विलगीकरण केंद्रात दाखल करा, अशा ...
पावस : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गावात लक्षणे नसलेला कोरोना रुग्ण सापडल्यास त्याला तत्काळ विलगीकरण केंद्रात दाखल करा, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले. फणसोप येथील श्री देवलक्ष्मी केशव माध्यमिक विद्यालय, कसोप-फणसोप येथे तयार करण्यात येत असलेल्या विलगीकरण केंद्राची पाहणी त्यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष उदय बने, जिल्हा परिषद आरोग्य सभापती बाबू महाप, रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंड्या साळवी, तालुका आरोग्य अधिकारी गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. सामंत यांनी येथील परिसरातील कोरोना रुग्ण, लसीकरण आदी विषयांचा आढावा यावेळी घेतला. लसीकरण केंद्रावर लसीकरण सकाळी वेळेत सुरू करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी सबंधितांना दिल्या.
पावस येथील कोरोना विलगीकरण केंद्राचे लोकार्पण
ग्रामंपचायत पावस व स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस यांच्या संयुक्त विद्यमाने भक्ती निवास, पावस येथे तयार करण्यात आलेल्या २८ बेडची व्यवस्था असलेल्या विलगीकरण केंद्राचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी सामंत यांनी या भागातील लसीकरण आणि रुग्ण याबाबतचा आढावा घेतला. या भागामध्ये विलगीकरण केंद्र तयार झाल्याने कोरोना संसर्ग टाळण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष उदय बने, जिल्हा परिषद आरोग्य सभापती बाबू महाप, रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंड्या साळवी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.