जिल्ह्यातील २०३ क्षय रुग्णांना घेतले दत्तक; पोषण आहाराची जबाबदारी स्वीकारली
By शोभना कांबळे | Published: April 4, 2023 08:08 PM2023-04-04T20:08:32+5:302023-04-04T20:09:06+5:30
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत केंद्रीय क्षयरोग विभागामार्फत प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत क्षयरुग्णांना दरमहा ५०० रुपये रुग्णाच्या खात्यावर जमा केले जातात.
रत्नागिरी : रत्नागिरीतील फिनोलेक्स कंपनी आणि मुकुल माधव फाऊंडेशन यांनी जिल्ह्यातील २०३ क्षय रूग्णांच्या पोषण आहाराची जबाबदारी स्वीकारली असून या रुग्णांना ६ महिन्याकरिता पोषण आहार पुरविला जाणार आहे. मंगळवार, दि. ४ एप्रिल रोजी रत्नागिरी तालुक्यातील ४० क्षय रुग्णांना पोषण आहार देऊन प्रारंभ करण्यात आला.
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत केंद्रीय क्षयरोग विभागामार्फत प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत क्षयरुग्णांना दरमहा ५०० रुपये रुग्णाच्या खात्यावर जमा केले जातात. परंतु ही मदत अत्यंत अल्प असून याखेरीज अन्नपुरवठा व इतर सुविधा व सहकार्य मिळणे आवश्यक आहे, जेणेकरून रुग्णाची प्रकृती तत्परतेने पूर्ववत होण्यास मदत होईल. या अनुषंगाने केंद्रींय स्तरावरून निक्षय मित्र होऊन रुग्णांना सहकार्य करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे दानशूर व्यक्ती, औद्योगिक संस्था, सामाजिक संस्था यांना आवाहन करण्यात आले आहे. त्या आवाहनानुसार रत्नागिरी तालुक्यातील फिनोलेक्स कंपनी-मुकुल माधव फाऊंडेशनने जिल्ह्यातील २०३ क्षय रुग्णांना दत्तक घेतले आहे. या रूग्णांना ६ महिन्याकरिता पोषण आहार पुरविला जाणार आहे. या पोषण आहाराचा प्रारंभ मंगळवार, ४ एप्रिल रोजी रत्नागिरी तालुक्यातील ४० क्षय रुग्णांना देऊन करण्यात आला.
फिनोलेक्स कंपनी - मुकुल माधव फाऊंडेशनचे डायरेक्टर चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठले, जिल्हा क्षयरोग अधिकारी, डॉ. महेंद्र गावडे, वैद्यकीय अधिकारी जिल्हा प्रशिक्षण केंद्र डॉ.सूर्यवंशी, फिनोलेक्स कंपनीचे व्यवस्थापक सागर चिवटे, एच आर व्यवस्थापक संदीप गोगले, डॉ. अनुप करमरकर, अभिषेक साळवी तसेच क्षयरोग विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन फिनोलेक्स कंपनी-मुकुल माधव फाऊंडेशन व जिल्हा क्षयरोग केंद्र, रत्नागिरी यांच्या मार्फत करण्यात आले होते.