लांजात अचानक झालेल्या स्फोटात प्रौढाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 02:00 PM2020-09-25T14:00:13+5:302020-09-25T14:01:10+5:30
लांजा : अचानक झालेल्या स्फोटात शिपोशी - बौध्दवाडी येथील ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू ओढवल्याची घटना गुरुवारी दुपारी १२.३० वाजता घडली. ...
लांजा : अचानक झालेल्या स्फोटात शिपोशी - बौध्दवाडी येथील ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू ओढवल्याची घटना गुरुवारी दुपारी १२.३० वाजता घडली. नेमकी कोणती स्फोटके होती, याचा शोध पोलीस घेत आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिपोशी येथील रमेश बंडू मोहिते (४५) याची पत्नी व दोन मुली विभक्त राहतात. रमेश घराशेजारी झोपडीत राहत होता. गुरुवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास रमेश घरात काहीतरी काम करत होता. शेजारी शेतामध्ये त्याचा मोठा भाऊ प्रकाश याला रमेशच्या झोपडीतून स्फोटाचा आवाज आला. त्यामुळे प्रकाशने रमेशच्या झोपडीकडे धाव घेतली. त्यावेळी रमेश हा छातीवर हात धरून झोपडीबाहेर धडपडत आला.
छातीला जोरदार इजा झाल्याने छातीतून रक्त वाहत होते. प्रकाशने ग्रामस्थांच्या मदतीने रमेशला आपल्या घरी आणले. छातीतून होत असलेला रक्तस्त्राव थांबविण्यासाठी त्याच्या छातीवर कापड दाबून ठेवले होते. रमेशच्या झोपडीत भाकरीचा तवा होता. स्फोट झाला त्यावेळी तवा त्याच्या छातीवर आपटून तो गंभीर जखमी झाला असल्याचा अंदाज आहे. त्याला उपचारासाठी हलविण्याच्या तयारीत असतानाच त्याचा मृत्यू झाला.
ही माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय चौधर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उदय धुमासकर, हेडकॉन्स्टेबल अरविंद कांबळे, नितीन पवार, राजेश वळवी, नरेश कदम यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. रमेश याला मासेमारी करण्याचा छंद होता. त्यासाठीच्या पदार्थाचा स्फोट झाल्याचा अंदाज आहे.