एकही रुपया न घेता उच्च न्यायालयात माणुसकीची लढाई, ॲड. ओवेस पेचकर दुर्घटनाग्रस्त कुटुंबाच्या मदतीला धावले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 06:16 PM2022-07-13T18:16:46+5:302022-07-13T18:17:25+5:30
वर्षभर दाद मागून व उपोषण करूनही न्याय न मिळाल्याने अखेर चिपळूणचे सुपुत्र ॲड. ओवेस पेचकर यांनी दखल घेतली
चिपळूण : तालुक्यातील पेढे कुंभारवाडी येथे गतवर्षी २२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीत दरड कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली होती. वर्षभर दाद मागून व उपोषण करूनही न्याय न मिळाल्याने अखेर चिपळूणचे सुपुत्र ॲड. ओवेस पेचकर यांनी याविषयी दखल घेत थेट न्यायालयीन नव्हे तर माणुसकीचा लढा सुरू केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी या दुर्घटनाग्रस्त कुटुंबाकडून न्यायालयीन लढ्यासाठी शुल्क स्वरूपात एकही रुपया न घेण्याचे ठरवले आहे.
ॲड. ओवेस पेचकर यांनी मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाविषयी व खड्ड्यांप्रश्नी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या लढ्यामुळे या कामावर नियंत्रण आले आहे. परशुराम येथील ग्रामस्थांच्या चौपदरीकरणात गेलेल्या जागांचा मोबदल्या प्रश्नी न्यायालयीन लढा सुरू आहे. याशिवाय रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, रत्नागिरी व लांजा येथील रखडलेल्या एसटी बसस्थानकाच्या कामाविषयीही उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. चिपळुणातील २०२१ मधील महापुरातही प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभागाने हलगर्जी करून जनतेचा जीव धोक्यात घातल्याबाबतही दाद मागितली आहे. या प्रत्येक न्यायालयीन लढ्यात त्यांनी जनहितार्थ उडी घेतली आहे.
ॲड. पेचकर यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटाच्या पायथ्याशी वसलेल्या पेढे गावातील दरडग्रस्त कुटुंबाच्या न्याय हक्कासाठी नवा लढा सुरू केला आहे. गतवर्षी परशुराम घाटातील दरड कोसळून तिघांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी कल्याण टोलवेज इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदार कंपनीचे संचालक, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी अशा एकूण नऊ जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा रविवारी पोलीस स्थानकात दाखल झाला आला. कोकणात प्रथमच असा गुन्हा नोंद झाला आहे. या कुटुंबाला शेवटपर्यंत न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पेढे येथील मांडवकर हे अत्यंत गरीब कुटुंब आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू होऊनही त्यांना कंपनीकडून कोणतीही मदत मिळाली नाही. वर्षभर त्यांनी शासन दरबारी फेऱ्या मारल्या. परंतु त्यांना कोणीही दाद दिली नाही. त्यामुळेच याविषयी आपण लक्ष घातले असून निव्वळ माणुसकी म्हणून त्यांच्याकडून एकही रुपया आपण घ्यायचे नाही, असे ठरविले आहे. - ॲड. ओवेस पेचकर, चिपळूण