रत्नागिरी जिल्ह्यातील सुवर्णदुर्ग किल्ल्याची युनेस्को पथकाकडून हवाई पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 12:03 PM2024-10-03T12:03:18+5:302024-10-03T12:03:44+5:30
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले महाराष्ट्रातील ११ किल्ले जागतिक वारसा यादीत नोंद केले जाणार
दापोली : जिल्ह्यातील एकमेव हर्णै सुवर्णदुर्ग किल्ल्याचा जागतिक वारसा यादीत समावेश होणार असून, युनेस्कोच्या पथकाकडून या किल्ल्याची हवाई पाहणी करण्यात आली.
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले महाराष्ट्रातील ११ किल्ले जागतिक वारसा यादीत नोंद केले जाणार आहेत. यासाठी युनेस्कोच्या पथकाने या किल्ल्याची पाहणी केली. त्याबाबत प्रशासकीय यंत्रणेकडून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेण्यात आला.
युनेस्को टीमकडून या किल्ल्याची हवाई पाहणी केली जात असताना आजूबाजूच्या कनकदुर्ग, पत्तेगड, भुईकोट या तीन किल्ल्यांचीही परिक्रमा करण्यात आली. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या जलदुर्गाचा जागतिक वारसा यादीत समावेश होण्याबाबतची प्रक्रिया वेगाने पुढे जात असल्याने परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. या किल्ल्याचा लवकरच समावेश होईल, असा विश्वास शिवप्रेमींना वाटत आहे.
सुवर्णदुर्ग किल्ल्याची गेल्या दहा दिवसांपासून शिवप्रेमींकडून साफसफाई केली जात होती. अखेर बुधवारी ही हवाई पाहणी झाल्याने सुवर्णदुर्ग किल्ल्याचा जागतिक वारसा यादीत समावेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.
सरखेल कान्होजी आंग्रे यांची यशोगाथा
सुवर्णदुर्ग किल्ला छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. तसेच सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाची यशोगाथा सांगणाऱ्या या किल्ल्याला मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे.