वीज गेल्याने रायपाटणमधील कोविड रुग्णांची परवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:32 AM2021-05-18T04:32:43+5:302021-05-18T04:32:43+5:30
राजापूर : ताैक्ते वादळानंतर विद्युत पुरवठा दोन दिवस खंडित झाल्याने त्याचा जोरदार फटका रायपाटणमधील कोविड सेंटरला बसला. ...
राजापूर : ताैक्ते वादळानंतर विद्युत पुरवठा दोन दिवस खंडित झाल्याने त्याचा जोरदार फटका रायपाटणमधील कोविड सेंटरला बसला. तेथे विजेची पर्यायी व्यवस्था नसल्याने रुग्णांवर उपचार करताना संबंधित आरोग्य यंत्रणेला नाकीनऊ आले. त्यापाठोपाठच कोविड सेंटरमध्ये पाणी संपल्याने रुग्णांची परवड झाली.
रविवारी कोकण किनारपट्टीवरील तौक्ते वादळाचा राजापूर तालुक्याला फटका बसला. वादळात विविध ठिकाणी विद्युत खांब कोसळल्याने संपूर्ण तालुक्याचा पुरवठा खंडित झाला. ओणी वीज उपकेंद्रातील तांत्रिक बिघाडामुळे तालुक्याचा पूर्व परिसर अंधाराखाली होता. रायपाटण येथील खापणे महाविद्यालयाच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात तालुक्याचे कोविड सेंटर सुरू आहे. सध्या तेथे शंभरच्या आसपास कोविड पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. अचानक विद्युत पुरवठा खंडित झाल्याने सदर कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांवर उपचार करताना संबंधित आरोग्य यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली. या कोविड सेंटरला जनरेटरची पर्यायी व्यवस्था नसल्याने रुग्णांवर उपचार करताना अनंत अडचणी आल्या.
एका बाजूला विजेअभावी उपचारांमध्ये अडचणी येत असतानाच तेथील पाणीपुरवठाही बंद झाला. रुग्णांना पिण्यासाठीही पाणी नव्हते. त्यामुळे रुग्णांच्या समस्येत आणखीनच भर पडली. सोमवारी दुपारपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत झाला नव्हता. पर्यायी व्यवस्थाही झाली नव्हती. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात होता.