१५ तासांनंतर बिबट्याची विहिरीतून सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 11:00 PM2017-11-12T23:00:43+5:302017-11-12T23:03:22+5:30
पावस : रत्नागिरी तालुक्यातील शिवारआंबेरे येथील विजय लाखण यांच्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला तब्बल १५ तासांच्या प्रयत्नांनंतर बाहेर काढण्यात यश आले आहे. रात्री ११.३० वाजता वनविभागाच्या कर्मचाºयांनी या बिबट्याला विहिरीतून मुक्त केले.
शनिवारी शिवारआंबेरे येथील विजय लाखण यांचा पंप अचानक बंद पडल्याने त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता, त्यांना बिबट्याचे दर्शन झाले. त्यानंतर वनविभागाला याबाबतची खबर देण्यात आली. वन विभागाचे कर्मचारी पिंजरा घेऊन दाखल झाले. त्यांनी बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वारंवार प्रयत्न केले. परंतु, विहिरीत असलेले पाणी व त्यातच तेथे असलेली मोकळी जागा यामुळे बिबट्या वारंवार त्या जागेचा आधार घेत असल्याने त्याला बाहेर काढण्यात अडथळे येत होते. विहिरीचे पाणी काढून बिबट्याला पिंजºयात आणण्याचा प्रयत्नही सुरू करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता पिंजºयात श्वान ठेवून पिंजरा विहिरीत सोडण्यात आला. मात्र, त्यालाही बिबट्याने जुमानले नाही.
बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वनविभाग सर्व बाजूंनी प्रयत्न करीत होते. अखेर रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पुन्हा विहिरीत पिंजरा सोडण्यात आला. या पिंजºयात बिबट्या अलगद येऊन बसला. त्यानंतर ११.३० वाजता त्याला बाहेर काढण्यात यश आले. हा बिबट्या १५ तास झाल्याने भुकेलेला होता. त्याला पिंजºयासकट बाहेर काढल्यानंतर जमलेल्या गर्दीच्या दिशेने तो झेप घेण्याचा प्रयत्न करीत होता.
हा बिबट्या सुमारे १० वर्षे वयाचा असून, नर जातीचा असल्याचे वनविभागाच्या कर्मचाºयांनी सांगितले.