तब्बल ४२ तासांचे अथक परिश्रम, अखेर देवमाशाचे पिल्लू खोल समुद्रात रवाना

By मनोज मुळ्ये | Published: November 15, 2023 04:03 PM2023-11-15T16:03:46+5:302023-11-15T16:07:54+5:30

गणपतीपुळे येथे सोमवारी (१३ नोव्हेंबर) सकाळी सहा वाजता देवमाशाचे पिल्लू समुद्रकिनारी आढळले.

After 42 hours of tireless rescue operation finally the baby whale fish left for the deep sea | तब्बल ४२ तासांचे अथक परिश्रम, अखेर देवमाशाचे पिल्लू खोल समुद्रात रवाना

तब्बल ४२ तासांचे अथक परिश्रम, अखेर देवमाशाचे पिल्लू खोल समुद्रात रवाना

गणपतीपुळे, रत्नागिरी : अनेक सरकारी यंत्रणा, अनेक ग्रामस्थ, खासगी कंपन्या, पर्यटक अशा शेकडो हातांच्या परिश्रमांमुळे गणपतीपुळे समुद्रकिनारी अडकलेले देवमाशाचे पिल्लू तब्बल ४२ तासांनी सुखरुप खोल समुद्रात पोहोचले.

वनविभाग, ग्रामपंचायत गणपतीपुळे, स्थानिक पोलिस प्रशासन, तटरक्षक दल, मत्स्य विभाग, महसूल विभाग, एमटीडीसी गणपतीपुळे, बोट क्लब गणपतीपुळे, जिंदल कंपनी, वाईल्ड लाईफ पुणे रेस्क्यू टीम तसेच असंख्य स्थानिक ग्रामस्थ व पर्यटकांनी मिळून ही मोहीम यशस्वी केली.

गणपतीपुळे येथे सोमवारी (१३ नोव्हेंबर) सकाळी सहा वाजता देवमाशाचे पिल्लू समुद्रकिनारी आढळले. तीस फूट लांब आणि सुमारे तीन ते साडेतीन टन वजन असलेल्या या देवमाशाच्या पिल्लाचे वय पाच ते सहा महिने असल्याचा अंदाज आहे.
प्रथम एमटीडीसीचे कर्मचारी व स्थानिक प्रशासनाने त्याला समुद्रात आतमध्ये नेऊन सोडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो मासा पुन्हा समुद्रकिनारी लागत होता. ही बातमी पसरताच किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली. वाळूत अडकलेल्या माशाला तीनवेळा समुद्रात ढकलण्यात आले. मात्र तीनही वेळा तो बाहेर आला.

खोल समुद्रात जाण्याइतके त्राण या माशामध्ये नसावेत, अशा अंदाजाने त्याच्यावर उपचार करण्यासाठी पुणे येथून वाईल्ड लाईफ रेस्क्यू टीम बोलावण्यात आली. या टीमने आठ सलाईन व तीन अँटिबायोटिक इंजेक्शन दिल्यानंतर हा मासा तरतरीच झाला. मात्र सायंकाळी भरतीची वेळ नसल्याने या माशाला जिवंत ठेवण्यासाठी त्याला पाणी उपलब्ध करुन देणे गरजेचे असल्याने एमटीडीसी कर्मचारी तसेच ग्रामपंचायतीचे जीवरक्षक यांनी समुद्राच्या पाण्याचा मारा करून माशाला जिवंत ठेवण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले. पुणे येथून आलेल्या रेस्क्यू टीमने तसेच वनविभागाने माशावर वेळीच योग्य उपचार केल्याने तो जगू शकला.

सोमवार सकाळपासून अव्याहतपणे हे प्रयत्न सुरूच होते अखेर मंगळवारी रात्री ११:३० वाजता जिंदल कंपनीचे जहाज (टग) व तटरक्षक दलाच्या बोटने या माशाला खोल समुद्रात व्यवस्थित व सुखरूप नेण्यात यश आले.

यावेळी वनविभागाच्या  विभागीय वनअधिकारी  गिरजा देसाई, सहाय्यक वनअधिकारी वैभव बोराटे परिक्षेत्र वन अधिकारी राजश्री कीर, परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार, वनपाल एन एस गावडे, सदानंद घाडगे, वनरक्षक मिताली कुबल, सहयोग कराडे, विक्रम कुंभार, सुजल तेली, आर डी पाटील, नायब तहसीलदार कांबळे तसेच तटरक्षक दलाचे कर्मचारी, जिंदल कंपनी, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप साळवी व पोलिस कर्मचारी, गणपतीपुळेचे ग्रामसेवक प्रवीण चौधरी व जीव रक्षक यांच्यासह एम टी डी सी चे व्यवस्थापक वैभव पाटील, सहाय्यक व्यवस्थापक रुपेश करंडे कर्मचारी तसेच  अनेक ग्रामस्थ व पर्यटकांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला.

Web Title: After 42 hours of tireless rescue operation finally the baby whale fish left for the deep sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.