व्यसनाधीन बापामुळे तीन मुलं झाली कायमची पोरकी

By admin | Published: August 31, 2014 10:58 PM2014-08-31T22:58:08+5:302014-08-31T23:47:56+5:30

ओरी-मधलीवाडीतील हृदयद्रावक घटना; तिन्ही मुलांचे जीवन बनलेय अंधकारमय

After the addict's father, three boys went on forever | व्यसनाधीन बापामुळे तीन मुलं झाली कायमची पोरकी

व्यसनाधीन बापामुळे तीन मुलं झाली कायमची पोरकी

Next

रहिम दलाल - रत्नागिरी  -आईला ठार मारल्यानंतर वडिलांनीही पोलीस कोठडीत आत्महत्या केल्यानंतर तीन कोवळ्या जीवांच्या डोक्यावरचं छत्रच हरपले. आता या तिघानाही वृध्द आजी आणि लहान काकांचाच आधार उरला असला तरी या तिघांचेही जीवन आंधारमय झाले आहे.
थोडीफार शेती आणि मोलमजुरी करुन जगणाऱ्या ओरी-मधलीवाडीतील वेलोंदे कुटुंबातील घरचा पुरूष काळ बनून आल्याने संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाले. व्यसनाधीन झालेला अंकुश महादेव वेलोंदे हा आपली पत्नी अपर्णा, आई वनिता, भाऊ अमित, मुली अमिषा, नंदिनी आणि मुलगा मनीष अशा कुटुंबासह राहात होता. तो मोलमजुरी करायचा. दारुच्या आहारी गेलेला अंकुश अनेकदा आपल्या पत्नीला मारहाण करीत असे. काही वेळेला मुलांनाही त्याच्या रोषाला सामोरे जावे लागत होते. एकदा तर त्याने मोठ्या मुलीच्या डोक्यात दगड घातला होता. मात्र, सुदैवाने ती बचावली होती.
मुलगी अमिषा इयत्ता सहावीत, मनीष पाचवीत आणि नंदिनी तिसरीच्या वर्गामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत आहेत. तिन्ही मुलं शाळेत हुशार मुलांमध्ये गणली जात आहेत.
गणेश चतुर्थी असल्याने ही तिन्ही मुलं आपल्या आई व आजीसह घरातच मोठ्या आनंदात होती. आपल्या कुटुंबावर एवढे मोठे संकट येणार आहे, याचा विचारही या कुटुंबातील कोणी सदस्याने केला नसेल.
शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणेच अंकुश दारुच्या नशेत घरी आला. त्यानंतर त्याने पत्नी अपर्णाला नेहमीप्रमाणेच शिव्या देण्यास सुरुवात केली. मात्र, ही बाब नेहमीची असल्याने मुलांनाही नवी नव्हती.
दारुच्या नशेत असलेल्या अंकुशने घरात असलेला गाडीचा लोखंडी पाटा उचलला आणि अपर्णाला मारहाण करण्यास सुरुवात केली. पाटा अपर्णाच्या डोक्यात हाणल्याने ती रक्तबंबाळ होऊन गतप्राण झाली. आई गेल्याने मुलांवर दु:खाचा डोंगर कोसळलेला असतानाच शनिवारी अंकुशनेही पोलीस कोठडीत आत्महत्या केली. त्यामुळे या तिन्ही मुलांच्या डोक्यावरुन आई-वडिलांचे छत्र हरवले. त्यांचे भविष्यच जणू अंधकारमय झाले आहे.
दारुच्या व्यसनाने अंकुशने आपलं कुटुंब उद्ध्वस्त केलं. आता ती तिन्ही मुलांचे जीवन आंधारमय झालं आहे. आजीही वृध्द झाल्याने तिचा आधार कुठपर्यंत मिळणार आहे. व्यसनाधीन झालेल्या अंकुशला अनेकांनी समजावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो निष्फळ ठरला होता. अखेर त्यांने व्यसनाच्या भरात स्वत:सह पत्नीचाही घात करुन मुलांना वाऱ्यावर सोडले. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण ओरी परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: After the addict's father, three boys went on forever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.