तब्बल २० तासांनी कोकण रेल्वेची वाहतूक पूर्ववत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 12:03 PM2024-07-12T12:03:57+5:302024-07-12T12:04:12+5:30
मडुरे ते गाेव्यातील पेडणे स्थानकादरम्यान असलेल्या पेडणे (पेरनेम) बाेगद्यात अतिवृष्टीमुळे चिखल, पाणी रुळांवर आले होते
रत्नागिरी : मुसळधार पावसामुळे पेडणे बोगद्यात कोसळलेली माती, चिखल २० तासांच्या प्रयत्नानंतर हटविण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले आहे. यानंतर विस्कळीत झालेली कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत झाली आहे. सायंकाळी ६:३५ वाजता पेडणे बोगद्यातून पहिली रेल्वे रवाना करण्यात आली.
मडुरे ते गाेव्यातील पेडणे स्थानकादरम्यान असलेल्या पेडणे (पेरनेम) बाेगद्यात अतिवृष्टीमुळे चिखल, पाणी रुळांवर आले. त्यामुळे सोमवारी मध्यरात्रीनंतर सिंधुदुर्ग मार्गे वाहतूक बंद होती. याचा सर्वाधिक फटका प्रवाशांना बसला होता. या मार्गावरील येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्व रेल्वे मंगळवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून बंद होत्या.
बुधवारी कोकण रेल्वे मार्गावरील काही गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही गाड्या अन्य मार्गावर फिरवण्यात आल्या होत्या. प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना मंगळवारपासूनच बोगद्यातील चिखल साफ करण्याच्या कामाला तातडीने लावले होते. सुमारे २०० कर्मचारी यासाठी कार्यरत होते.