राष्ट्रवादीच्या स्वीकृत नगरसेवकाचा अर्ज बाद
By admin | Published: July 29, 2016 09:45 PM2016-07-29T21:45:39+5:302016-07-29T23:28:53+5:30
गुहागर नगरपंचायत : समन्वयाच्या अभावामुळे बसला फटका
गुहागर : गुहागर नगरपंचायत स्वीकृत नगरसेवकपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कृष्णा रहाटे यांचा आलेला एकमेव अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र हजारे यांनी बाद ठरवला. बहुमतात सत्ता असूनही केवळ समन्वय नसल्याने ही नामुश्कीची वेळ आल्याची चर्चा पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे. गुहागर नगरपंचायतीत राष्ट्रवादीचे ११, भाजप ४ व दोन्ही पक्षांचे प्रत्येकी एक नगरसेवक असे १७ संख्याबळ आहे. राष्ट्रवादीची एकतर्फी सत्ता असल्याने सर्वांना संधी मिळावी, यासाठी प्रथम सिध्दिविनायक जाधव व त्यानंतर मयुरेश कचरेकर यांना स्वीकृत नगरसेवकपदी संधी देण्यात आली, तर भाजपकडून मित्र पक्षाचा एकही सदस्य नसल्याने शिवसेनेच्या विनायक बारटक्के यांची वर्णी लागली. राष्ट्रवादीचे मयुरेश कचरेकर यांच्या नगरसेवकपदाच्या राजीनाम्यानंतर रहाटे, श्यामकांत खातूंबरोबर नगरसेवक निवडणुकीमध्ये काही मतांनी पराभव झालेल्या मानसी शेटे याचेही नाव चर्चेत होते. यामधून पक्षाच्यावतीने कृष्णा रहाटे यांना संधी देण्यात आली होती. कृष्णा रहाटे यांनी स्वीकृत नगरसेवक पदासाठी अर्ज सादर केल्यानंतर निवडणूक अधिकारी रवींद्र हजारे यांनी केलेल्या छाननीमध्ये आवश्यक कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. याबाबत मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी सांगितले की, स्वीकृत नगरसेवक पात्रतेसाठी वकील, आर्किटेक्ट, डॉक्टर आदी काही प्रकारचा अनुभव असावा लागतो. तसे पद नसल्यास एखाद्या धर्मादाय मान्यताप्राप्त विश्वस्त संस्थेत पाच वर्षे काम केल्याचा अनुभव असावा लागतो.
कृष्णा रहाटे यांनी २००२ मधील धर्मादाय संस्थेचा केलेला अर्ज व नोंदणीपत्र सादर केले होते. हा अर्ज व नोंदणीपत्र आवश्यक निकषामध्ये न बसल्याने कृष्णा रहाटे यांचा अर्ज बाद ठरवण्यात आला. काही कार्यकर्त्यांनी अभिनंदनासाठी आणलेले पुष्पगुच्छ परत नेण्याची वेळ आली. नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करून लवकरच ही निवड केली जाईल, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
स्वीकृत नगरसेवक कचरेकर यांच्या रिक्त झालेल्या नगरसेवकपदाच्या निवडीवेळी कृष्णा रहाटे यांचे नाव चर्चेत होते. कागदपत्र अपूर्ण असल्याने रहाटे यांना संधी मिळाली नव्हती. काही दिवस आधीच पक्षाकडून नाव जाहीर झाले असताना जाणीवपूर्वक समन्वयाचा अभाव ठेवून कृष्णा रहाटे यांचा राजकीय ‘गेम’ केल्याची चर्चा शहरात सुरू आहे.