Ratnagiri: क्रिकेट खेळून मैदानातून बाहेर आला, चक्कर येऊन उलटी होऊन तरुणाचा मृत्यू झाला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 12:43 PM2024-02-13T12:43:38+5:302024-02-13T12:43:57+5:30
दाेन वर्षांपूर्वीच झाला हाेता विवाह
चिपळूण (जि. रत्नागिरी): क्रिकेट खेळून मैदानातून बाहेर आल्यावर चक्कर येऊन उलटी हाेऊन ओमळी (ता. चिपळूण) येथील तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी घडली. दिनेश दिलीप यादव (३०) असे या तरुणाचे नाव आहे. ताे मुंबई बीएसटीमध्ये वाहक म्हणून नोकरी करत होता. सुट्टीत क्रिकेटचा सामना खेळण्यासाठी ताे ओमळी गावी आला हाेता.
चिपळूण तालुक्यातील ओमळी गोंधळेवाडी येथील क्रिकेटपटू दिनेश यादव नारदखेरकी-जाधववाडी (ता. चिपळूण) येथे रविवारी दुपारी २:३० क्रिकेटचा सामना खेळण्यासाठी गेला होता. क्रिकेटचा सामना खेळून मैदानातून बाहेर पडत असतानाच त्याला अचानक चक्कर आली आणि उलटी झाली. त्यामुळे त्याला तत्काळ खासगी डाॅक्टरांकडे उपचारासाठी नेण्यात आले. डाॅक्टरांनी त्याला तपासून पुढील उपचाराकरिता घेऊन जाण्यास सांगितले.
त्यानंतर, गणेशखिंडमार्गे येत असताना, रस्त्यातच असणाऱ्या दुसऱ्या खासगी डाॅक्टरांकडे त्याला नेण्यात आले. तिथे त्याला पुन्हा चक्कर आली. त्यानंतर, कामथे उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याचा ईसीजी काढून तपासणी केली असता, त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. याबाबत चिपळूण पाेलिस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नाेंद करण्यात आली आहे.
दाेन वर्षांपूर्वीच विवाह
दिनेश यादव याचा दोन वर्षांपूर्वीच विवाह झाला हाेता. त्याला एक वर्षाचा छाेटा मुलगाही आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे. ताे मुंबई बीएसटीमध्ये वाहक म्हणून नोकरी करत होता. सुट्टीत क्रिकेटचा सामना खेळण्यासाठी ताे ओमळी गावी आला हाेता. मात्र, त्याची गावाकडची ही भेट शेवटची ठरली.