पाच दिवसांनी चिपळुणातील वाशिष्ठी पूल वाहतुकीसाठी खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:32 AM2021-07-27T04:32:20+5:302021-07-27T04:32:20+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : मुंबई - गोवा महामार्गावरील वाशिष्ठी पूल महापुरात खचल्याने हा मार्ग पाच दिवस बंद होता. ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : मुंबई - गोवा महामार्गावरील वाशिष्ठी पूल महापुरात खचल्याने हा मार्ग पाच दिवस बंद होता. त्यामुळे पूल खचलेल्या ठिकाणी तातडीने भराव व काँक्रिटीकरण करत हा मार्ग सोमवारी सकाळी ११ वाजल्यापासून सुरु केला आहे. परंतु, या पुलावरून अवजड वाहतूक बंद ठेवण्यात आली असून, त्यासाठी दोन्ही बाजूंनी बॅरिकेट्स उभारण्यात आले आहेत.
महापुरात अवघे चिपळूण उद्ध्वस्त झाले आहे. घरे व इमारतींचे नुकसान झाले असतानाच रस्ते व महामार्गाचे अतोनात नुकसान झाले. या महापुरात महामार्गावरील ब्रिटीशकालीन वाशिष्ठी जुन्या पुलाचा काही भाग खचला व तेथील माती वाहून गेल्याने हा मार्ग बंद पडला. त्याचवेळी एन्रॉन बायपास रोडवरील पूलही खचला तसेच पुलाला तडे गेले. त्यामुळे हाही मार्ग बंद झाला. या परिस्थितीमुळे मुंबई - गोवा महामार्गावरील सर्व वाहने अडकून पडली होती.
महापुराचे पाणी ओसरल्यानंतर तत्काळ उपाययोजना सुरु केल्या. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार शेखर निकम यांनी आढावा बैठक घेऊन वाशिष्ठी पूल वाहतुकीला खुला करण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. राष्ट्रीय महामार्ग विभाग व ठेकेदार कंपनीला तशा सूचना केल्या होत्या. त्यानुसार अत्याधुनिक यंत्रणा वापरून पुलाच्या वाहून गेलेल्या भागात भराव करून व त्यावर काँक्रिटीकरण केले आहे. तसेच पुलाच्या दोन्ही बाजूने बॅरिकेट्स उभारून अवजड वाहनांना बंदी घातली आहे.