शिक्षक मिळाल्याने शृंगारपूर शाळा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 11:42 AM2019-09-17T11:42:24+5:302019-09-17T11:43:04+5:30
संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर शाळेला चार शिक्षक मिळाल्याने अखेर सोमवारी दुपारनंतर ग्रामस्थांनी शाळाबंद आंदोलन मागे घेतले. गेली कित्येक महिन्यांची शिक्षकांची मागणी प्रशासनाने मान्य करुन विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान उशिरा का होईना पण टाळले. याबाबत शृंगारपूर ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासन व पत्रकारांचे जाहीर आभार मानले.
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर शाळेला चार शिक्षक मिळाल्याने अखेर सोमवारी दुपारनंतर ग्रामस्थांनी शाळाबंद आंदोलन मागे घेतले. गेली कित्येक महिन्यांची शिक्षकांची मागणी प्रशासनाने मान्य करुन विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान उशिरा का होईना पण टाळले. याबाबत शृंगारपूर ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासन व पत्रकारांचे जाहीर आभार मानले.
तालुक्यातील आदर्श केंद्रशाळा, शृंगारपूर शाळेत चार शिक्षक मंजूर असताना जूनपासून फक्त दोन शिक्षिकाच कार्यरत होत्या. त्यांचीही ११ सप्टेंबरला बदली करण्यात आली होती. परंतु त्यांच्या बदली एकही शिक्षक शाळेत हजर न झाल्याने शुक्रवार तारीख १३पासून ग्रामस्थांनी शाळाबंद आंदोलन केले होते.
नियमाप्रमाणे दोन पदवीधर शिक्षक व दोन उपशिक्षक मिळत नाहीत, तोपर्यंत शाळा उघडणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता. प्रभारी गटशिक्षणाधिकारी शशिकांत त्रिभुवणे यांनी मार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते. त्याचवेळी नायरी ग्रामविकास, मुंबई मंडळाचे सदस्य प्रवीण जाधव यांनी हा विषय पंचायत राज समितीचे प्रमुख व विधानसभा सचिव आठवले यांच्यासमोर ठेवला.
सर्व कागद पत्र पाहताच आठवले यांनी रत्नागिरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांना तत्काळ चौकशी करुन कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे आंचल गोयल यांनी या शाळेवर दोन शिक्षणसेविका एक पदवीधर शिक्षक व एक उपशिक्षक यांची नेमणूक केली. ते चारही शिक्षक हजर झाल्यामुळे शृंगारपूर ग्रामस्थांनी पुकारलेले शाळा बंद आंदोलन सोमवारी मागे घेतले. गेले तीन दिवस बंद असलेली शाळा आता मंगळवारपासून पूर्ववत होणार आहे.