सोने व्यापारी खून प्रकरण: खून करून तिघेही घरी जाऊन जेवले; मध्यरात्री मृतदेहाची लावली विल्हेवाट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 05:19 PM2022-09-23T17:19:52+5:302022-09-23T17:20:21+5:30
कीर्तीकुमार रत्नागिरीत आले तेव्हा त्यांच्याकडे १० लाखांचे दागिने होते.
रत्नागिरी : सोने व्यावसायिक कीर्तीकुमार कोठारी याचा खून करून रत्नागिरीतील तिघेही संशयित आरोपी घरी जाऊन जेवले आणि त्यानंतर मध्यरात्री आबलोलीत जाऊन मृतदेह टाकून दिला, अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. रत्नागिरीतील सुवर्णकार भूषण खेडेकर याने आर्थिक व्यवहारातून हा खून केला असल्याची कबुली दिली आहे. मात्र अनेक प्रश्न अजून अनुत्तरित आहेत.
सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास भूषण खेडेकर, महेश चौगुले आणि फरीद होडेकर यांनी गोखले नाका परिसरातील त्रिमूर्ती ज्वेलर्समध्येच दोरीच्या सहाय्याने कीर्तीकुमार कोठारी यांचा गळा आवळून खून केला. त्यांचा मृतदेह ज्वेलर्समध्येच ठेवून तिघेही घरी गेले. ठरल्यानुसार मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्यांनी मृतदेह दोन गोणींमध्ये भरला. महेश चौगुले आपली रिक्षा घेऊन आला. त्या रिक्षात मृतदेह भरुन तिघेही मजगाव रोडने करबुडे, राईभातगावमार्गे आबलोली येथे गेले. तेथील नदीच्या पुलाखाली मृतदेह गोणीत भरलेल्या अवस्थेतच टाकून दिला. त्यानंतर तिघेही रत्नागिरीत परतले.
गुरुवारी सायंकाळी शहर पोलिसांनी त्रिमूर्ती ज्वेलर्समध्ये जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. खून नेमका कसा केला गेला, त्याची माहिती त्यांनी भूषणकडून घेतली. हा खून कट रचून केला आहे का? याचा शोध पोलीस घेत आहेत. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विनीत चौधरी करत आहेत.
लोकेशन मुंबईचे?
स्वप्नाली सावंत यांच्या हत्येनंतर त्यांचे मोबाईल लोकेशन लांजा दाखविण्याचा प्रयत्न केले गेला. तसाच काहीसा प्रकार इथेही पुढे आला आहे. कीर्तीकुमार यांचा खून रत्नागिरीत झाला. मात्र त्यांच्या मोबाईलचे लोकेशन मुंबई आहे. भूषणने त्यांचा मोबाईल मुंबईपर्यंत कसा पोहोचविला, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दहा लाखांचे दागिने गेले कुठे?
कीर्तीकुमार रत्नागिरीत आले तेव्हा त्यांच्याकडे १० लाखांचे दागिने होते. मात्र त्यांच्या लॉजवर त्यांचे केवळ सामानच होते. दागिने गायब असल्याने ते भूषणनेच गायब केले का? याचा शोध पोलीस घेत आहेत.
काहीच न झाल्याचा आव
मला इथे का बोलावलं आहे? माझं इथे काय काम, असे प्रश्न भूषणने पाेलिसांना विचारले. मात्र, पोलिसांनी त्याला सुरुवातीला कसलीच जाणीव करु दिली नाही. त्यामुळे काही वेळेपुरता भूषण बिनधास्तपणे पोलीस स्थानकात बसला होता.
नेमके कारण काय?
आर्थिक व्यवहारातून भूषणने कीर्तीकुमार यांची हत्या केली असली तर त्यांच्यातील व्यवहार किती लाखांचा होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मागील व्यवहारातील ३५ हजार रुपये तो कीर्तीकुमार यांना देणे होता. मात्र, हे कारण हत्या करण्यासाठी पुरेसे नसल्याने आता हत्येचे मुख्य कारणाचा शोध पोलीस घेत आहेत.
लोकांची देणी वाढली?
कीर्तीकुमार यांचे ३५ हजार रुपये देणे होता. मात्र, इतरांची देणी भरपूर होती, अशी माहिती पोलीस तपासात पुढे येत आह. ही देणी वाढत असल्यानेच त्याने हे कृत्य केले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी काढला आहे. अर्थात पोलीस तपासात आणखी अनेक गोष्टी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.