शिवसेनेच्या दुसऱ्या यादीनंतर आऊट गोर्इंग?
By admin | Published: January 30, 2017 11:42 PM2017-01-30T23:42:04+5:302017-01-30T23:42:04+5:30
जिल्हा परिषद निवडणूक : डावललेले इच्छुक अन्य पक्षांच्या आश्रयाला?
रत्नागिरी : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेनेने पहिली यादी जाहीर केल्यानंतर शिवसेनेअंतर्गत असंतोष वाढला आहे. या यादीत ज्यांना डावलण्यात आले, त्यांनी अन्य पक्षांमध्ये जाण्यासाठी मोर्चेबांधणी केल्याची जोरदार चर्चा आहे. सेनेच्या दुसऱ्या यादीनंतर असंतोषाचा उद्रेक होण्याची शक्यता असून, सेनेतून ‘आऊट गोर्इंग’ सुरू होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ५५ जागांसाठी, तर रत्नागिरी, राजापूर, लांजा, संगमेश्वर, चिपळूण, गुहागर, खेड, मंडणगड, दापोली या ९ पंचायत समित्यांच्या ११० जागांसाठी येत्या २१ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. शिवसेनेत उमेदवारीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी झाल्याने वरिष्ठ नेत्यांसाठी ती मोठीच डोकेदुखी ठरली आहे. काही गट व गणांमध्ये अनेक मातब्बर इच्छुक उमेदवार पुढे आल्याने उमेदवारी कोणाला द्यावी व कोणाला बाजूला ठेवावे, हे ठरविणे पक्ष नेत्यांसाठी अडचणीचे ठरत आहे.
शिवसेना जिल्ह्यातील नंबर वन पक्ष असल्याने पक्षाकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या सर्वांचे समाधान करणे अशक्य असल्याने अनेकजण नाराज होऊन दुसऱ्या पक्षाचा मार्ग धरतील, ही भीतीही निर्माण झाली. सर्वात प्रथम उमेदवार यादी जाहीर करून अन्य पक्षांना धक्का देण्याचा सेना नेत्यांचा प्रयत्न त्यामुळे फसला. यादी लवकर जाहीर केली तर बंडखोरीच्या समस्येला सामोरे जावे लागण्याची भीती होती. त्यामुळेच यादी जाहीर करण्याचा मुहूर्त सातत्याने पुढे ढकलण्यात आला. २८ नोव्हेंबरला गट व गणांची मिळून १०६ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. त्यातही खाडाखोड असल्याने सेनेत वादंग माजला आहे. या पार्श्वभूमीवर येत्या चार दिवसात शिवसेनेत मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता आहे. अनेकजण पक्षाला जय महाराष्ट्र करून दुसऱ्या पक्षात जाण्याच्या तयारीत आहेत.
जिल्ह्यातील रत्नागिरी, दापोली, खेड व चिपळूण या तालुक्यांमध्ये शिवसेनेत मुळातच अंतर्गत गटबाजी मोठ्या प्रमाणात आहे. दापोलीमध्ये माजी आमदार सूर्यकांत दळवी यांना एकटे पाडण्यात आल्याने ते प्रचंड नाराज आहेत. रत्नागिरी तालुका शिवसेनेत नवा-जुना वाद उफाळून आला आहे. जुन्या शिवसैनिकांना डावलून नव्या गटातील कार्यकर्त्यांना अधिक जागा देण्यात आल्याने जुने शिवसैनिक प्रचंड नाराज आहेत. त्यातच इच्छुकांची संख्या अधिक असल्याने नाराजीही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे बंडखोरीची शक्यता वाढली आहे. अनेकजण भाजपच्या संपर्कात असून, भाजपलाही निवडून येणाऱ्या उमेदवारांची प्रतीक्षा आहे. त्यामुळे येत्या ४ दिवसात सेनेतून होणारे आऊटगोर्इंग हे भाजपसाठी ‘इनकमिंग’ ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. (प्रतिनिधी)