Ratnagiri Crime: आठ दिवस मुक्काम करून हॉटेलचे बिल न देताच केला पोबारा, दोघांविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 04:21 PM2023-03-10T16:21:35+5:302023-03-10T16:21:57+5:30
आठ दिवसांचे एकूण बिल ३४,४३५ रुपये इतके झाले हाेते
रत्नागिरी : काही दिवसांपूर्वी चिपळूण येथील हाॅटेल व्यावसायिकाचे बिल थकविल्याचा प्रकार घडलेला असतानाच दापाेलीतील हाॅटेल व्यावसायिकाच्या बाबतीतही असाच प्रकार घडला आहे. हाॅटेलमध्ये आठ दिवस मुक्काम करून हाॅटेलचे ३४ हजार ४३५ रुपये न देताच दाेघांनी पाेबारा केला आहे. याप्रकरणी दापाेली पाेलिस स्थानकात दाेघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रंजित सिंग आणि रुपल सिंग (दाेघेही रा. अमृतसर, पंजाब) अशी दाेघांची नावे आहेत. याबाबत भिकाजी राेंगा घडशी (५६, रा. शिवाजीनगर, दापाेली) यांनी फिर्याद दिली आहे. रंजित सिंग व रुपल सिंग हे दाेघे १ मार्च राेजी रात्री १०:३० वाजता दापाेलीतील हाॅटेल पथिक फॅमिली माळ येथे राहण्यासाठी आले हाेते. हाॅटेलमध्ये खाेली बुक करून दाेघे ८ मार्च राेजी सकाळी ७ वाजेपर्यंत वास्तव्याला हाेते. हाॅटेलमध्येच त्यांनी जेवण, नाश्ता केला. या दाेघांचे आठ दिवसांचे एकूण बिल ३४,४३५ रुपये इतके झाले हाेते.
या बिलाबाबत हाॅटेल व्यावसायिक भिकाजी घडशी यांनी विचारणा केली. मात्र, बिल न देताच दाेघांनी तिथून पाेबारा केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच भिकाजी घडशी यांनी दापाेली पाेलिस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. अधिक तपास दापाेली पाेलिस करत आहेत.
फसवणुकीचा नवा फंडा
हाॅटेलमध्ये वास्तव्य करून बिलाची रक्कम न देताच फसवणूक करण्याचा नवा फंडा सुरू झाला आहे. रंजित सिंग व रुपल सिंग या दाेघांनी चिपळुणातील हाॅटेल अयाेध्यामध्ये वास्तव्य केले हाेते. या हाॅटेलच ७२,४४० रुपयांचे बिल न देताच दाेघे पसार झाले हाेते. आता दापाेलीतील हाॅटेल व्यावसायिकाला अशाच प्रकारे त्यांनी चुना लावला आहे.