रत्नागिरीत खड्डे पेटले, राजकीय रणकंदन सुरू; आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 12:25 PM2024-07-30T12:25:00+5:302024-07-30T12:26:27+5:30
माजी खासदार नीलेश राणे यांनीही या विषयात उडी घेतली
रत्नागिरी : शहरात पडलेल्या खड्ड्यांबाबत ‘आम्ही रत्नागिरीकर’ म्हणून बोलावलेली सभा उधळली गेल्यानंतर आता त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. सोशल मीडियावरही हा विषय वादाचा झाला असून, सामंत समर्थक आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. माजी खासदार नीलेश राणे यांनीही या विषयात उडी घेतली आहे. कोणत्याही विषयावर बोलावलेली सभा होऊ न देणे अयोग्य असल्याचे सांगत त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना या विषयात ठाम भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे.
रत्नागिरी शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. नगर परिषदेपर्यंत लाेकभावना पोहोचिवण्यासाठी ‘आम्ही रत्नागिरीकर’ म्हणून सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन करत सोशल मीडियावरून एकत्र येण्याची हाक देण्यात आली. रविवार, २८ रोजी दुपारी त्यासाठी सभा बोलावण्यात आली होती. या सभेला शिंदेसेनेचे पदाधिकारीही पोहोचले. केवळ एकाच बाजूने आणि एकाच विषयावर चर्चा नको, अशी भूमिका मांडत या पदाधिकाऱ्यांनी मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत केलेल्या कामांची यादीच सभेत सादर केली. मारुती मंदिरापर्यंतच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाले आहे आणि त्यापुढील रस्त्यांचेही काँक्रिटीकरण लवकरच होणार आहे. पाऊस कमी झाल्यानंतर ते काम हाती घेतले जाणार आहे, अशी भूमिका या पदाधिकाऱ्यांनी मांडली.
मंत्री सामंत यांच्याविरोधात कोणी आकसाने सभा घेणार असेल, त्यांना विनाकारण लक्ष्य केले जाणार असेल तर आम्ही ते होऊ देणार नाही, असेही या पदाधिकाऱ्यांनी सांगितल्याने पुढे सभा झालीच नाही.
रविवारी संध्याकाळी हा विषय चांगलाच पसरला आणि सोशल मीडियावर त्यावरून वादावादी सुरू झाली. सामंत समर्थकांनी रत्नागिरीत झालेल्या कामांची उजळणी केली, तर विरोधकांनी सभा होऊ दिली नाही, यावरून जोरदार टीका सुरू केली आहे. दोन्ही बाजूने यावर जाेरदार प्रतिक्रिया उमटत आहेत.