पावणेदोन महिन्यांनंतर रत्नागिरीतील जनजीवन पूर्वपदावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:22 AM2021-06-11T04:22:21+5:302021-06-11T04:22:21+5:30
रत्नागिरी : जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी चौथ्या स्तरात अनलाॅकची नियमावली बुधवारी जाहीर करताच गुरुवारी सकाळी सुमारे पावणेदोन महिने बंद ...
रत्नागिरी : जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी चौथ्या स्तरात अनलाॅकची नियमावली बुधवारी जाहीर करताच गुरुवारी सकाळी सुमारे पावणेदोन महिने बंद असलेली दुकाने आणि व्यवसाय सुरू झाले. त्यामुळे गेले सात दिवस घरात अडकलेल्या नागरिकांनी कोरोनाला विसरून अत्यावश्यक वस्तूंबरोबरच इतर वस्तूंच्या खरेदीसाठी दुकानात गर्दी केली.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच जिल्हाधिकारी मिश्रा यांनी १५ एप्रिलपासून लाॅकडाऊन जाहीर केले. यात किराणा, औषधे, दूध, कृषीविषयक सेवा आदी अत्यावश्यक बाबी वगळून सर्व दुकाने, व्यवसाय बंदच होते. त्यानंतरही काेरोनाची रुग्णसंख्या कमी न होता वाढू लागल्याने पुन्हा ३ ते ९ जून या कालावधीत कडक लाॅकडाऊन सुरू केले. या वेळी औषधे, घरपोच दूध सेवा वगळता अत्यावश्यक अन्य सेवा बंद ठेवून कडक संचारबंदी लागू केली. मात्र, यासाठी व्यापारी संघटनेने तीव्र विरोध दर्शविला. अखेर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्यासोबत झालेल्या व्यापाऱ्यांच्या बैठकीत व्यापाऱ्यांनी काहीही झाले तरी ९ जूननंतर दुकाने उघडणारच, अशी आक्रमक भूमिका घेतली. जनउद्रेकाची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी अन्य जिल्ह्यांप्रमाणे बुधवारी चौथ्या स्तरात रत्नागिरीतही अनलाॅकसाठी नियमावली जाहीर केली. त्यामुळे नागरिकांसह व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला.
अखेर गुरुवारी सर्व दुकाने उघडताच नागरिकांनी विविध वस्तूंच्या खरेदीसाठी दुकानात गर्दी केली. त्यातच सर्व दुकानांची वेळ ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंतच असल्याने नागरिकांची अधिकच तारांबळ उडालेली दिसत होती. रस्त्यावरही नेहमीप्रमाणे वर्दळ वाढली. त्यामुळे सुमारे पावणेदोन महिन्यांनंतर जिल्ह्यातील जनजीवन पुन्हा पूर्वपदावर आले होते.
दोन दिवसांच्या संचारबंदीचा धसका
जिल्ह्यात अतिवृष्टीचा हवामान खात्याने अंदाज वर्तविल्याने जिल्हा प्रशासनाने दोन दिवस संचारबंदी करणार, असे जाहीर केल्याने सात दिवसांची संचारबंदी उठताच नागरिकांनी सकाळी ७ वाजल्यापासून भाजी विक्रेत्यांसमोर गर्दी केली होती. तसेच इतर दुकानांमध्येही नागरिक गर्दी करत होते.
भाजीचे दर दामदुप्पट
सात दिवस किराणा, भाजीपाला विक्री बंद होती. गुरुवारी सर्व दुकाने सुरू होताच भाजीचे दर दामदुप्पट झाले. काही विक्रेत्यांनी विविध भागांत वाहनाद्वारे विक्री करण्यास सुरुवात केली. भाव वधारलेले असले तरी पुन्हा दोन दिवसांची संचारबंदी झाली तर भाजी मिळणार नाही, या भीतीने नाइलाजाने भाज़ी खरेदी करताना दिसत होते. दुधाची खरेदीही मोठ्या प्रमाणावर झाल्याने बहुतांश दुकानातील दूध पिशव्या संपल्या होत्या.
पहाटेपासून रस्त्यावर वर्दळ
सात दिवसांची संचारबंदी उठताच पहाटेपासून मुख्य मार्गावर तसेच अन्य मार्गांवर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. अनलाॅक प्रक्रिया सुरू झाल्याने सामान्य नागरिकांच्या मनात पाेलिसांबद्दल भीती राहिली नव्हती. सायंकाळी ५ वाजल्यापासून संचारबंदी असल्याने चार वाजल्यानंतर पुन्हा शुकशुकाट दिसू लागला.
कापड दुकाने, सोन्याची दुकाने बंदच
रत्नागिरी जिल्ह्यात अनलाॅंक प्रक्रियेला प्रारंभ झाला असला तरी अजूनही कापड दुकाने, सोन्याची दुकाने यांना सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे गुरुवारी ही दुकाने बंदच होती.