मुख्यमंत्र्यांच्या लेखी आश्वासनानंतर पत्रकारांचे उपोषण स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 05:10 PM2019-06-25T17:10:40+5:302019-06-25T17:13:17+5:30
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर खेड येथे सुरू असलेले पत्रकारांचे बेमुदत उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
खेड : मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर खेड येथे सुरू असलेले पत्रकारांचे बेमुदत उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
गेले पाच दिवस मटका माफियांविरोधात कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी येथील पत्रकारांसह जिल्ह्यातील पत्रकारांनी उपोषण सुरू केले होते. खेड शहरासह तालुक्यातील मटका व जुगार व्यवसायाविरुद्ध वृत्तपत्रात लिखाण केल्याचा राग मनात धरून खेड येतील पत्रकारांना मटका माफियांकडून शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. तसेच दोन पत्रकारांना बेदम मारहाण करण्यात आली होती.
संबंधित मटका माफियांवर तडीपारी बरोबरच मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करावी, या प्रवृत्तीला खतपाणी घालणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करून बदली करण्यात यावी या मागणीसाठी पत्रकारांनी खेड प्रांत कार्यालयासमोर २० जूनपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. दरम्यान या उपोषणाची गंभीर दखल पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी घेतली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पावसाळी अधिवेशन दरम्यान भेट घेऊन उपोषणकर्त्या पत्रकारांची मागणी निदर्शनास आणून दिली. मुख्यमंत्र्यांनीदेखील तातडीने कारवाईची लेखी आदेश दिले. या आदेशाची प्रत युवा सेनेचे नेते योगेश कदम यांनी उपोषणकर्त्या पत्रकारांना दाखवली. उपोषणकर्त्या पत्रकारांनी या पत्राबाबत चर्चा करून सुरु असलेले उपोषण तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
यावेळी प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने, युवानेते योगेश कदम यांच्या हस्ते उपोषणकर्ते पत्रकार अनुज जोशी, सिद्धेश परशेट्ये, अजित जाधव व दिवाकर प्रभू याना सरबत देऊन उपोषण सोडण्यात आले. यावेळी सतीश कदम, प्रमोद पेडणेकर, राकेश शिंदे, मकरंद भागवत, किशोर साळवी, देवेंद्र जाधव, मंदार आपटे, ज्ञानेश्वर रोकडे, चंद्रकांत बनकर, माजी नगरसेवक संजय मोदी,राजेश बुटाला, मिनार चिखले आदी उपस्थित होते.